‘निविष्ठा खरेदी’मध्ये करोडो रुपयांचा घोटाळा
By Admin | Updated: August 15, 2014 00:47 IST2014-08-15T00:47:21+5:302014-08-15T00:47:21+5:30
चौकशीअंती उघड झालेल्या घोटाळ्याची फाईल गायब

‘निविष्ठा खरेदी’मध्ये करोडो रुपयांचा घोटाळा
सोलापूर:
कृषी खात्याच्या अनेक कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत़ शासनाच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्याची वाट कशी लावायची आणि शेतकऱ्यांच्या ‘टाळूवरचे लोणी’ कसे खायचे याचे धडे कृषी खात्यात दिले जातात़ निविष्ठा खरेदीमध्ये (शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यांचे पॅकेज) करोडो रुपयांचा घोटाळा प्रतिवर्षी होत असतो़ सोलापूर जिल्ह्यामध्ये तो झाला़ चौकशीत तो सिद्ध झाला; मात्र पुढे विभागस्तर आणि मंत्रालयात या घोटाळ्याची फाईल पोहोचल्यावर ती ‘गायब’ करण्यात आली आहे़
चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी शासनही उभे राहत नाही आणि कर्मचारीही उभे राहत नाहीत. त्यामुळे वाशिमचे कृषी उपसंचालक अशा वर्ग एकच्या पदावर काम करणाऱ्या आणि आजवर अनेक घोटाळे बाहेर काढणाऱ्या आबासाहेब साबळे यांनी या खात्याला ‘रामराम’ ठोकला आहे़ यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मंत्रालयातील मजल्यापासून ते कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पायरीपर्यंत आणि तेथून पुढे शेतीच्या बांधापर्यंत या भ्रष्टाचाराची पाळेमुळे रोवली आहेत़ संगनमताने टोपी घालण्याच्या या प्रकारामुळे अल्पभूधारक शेतकरी योजनांपासून वंचित राहतात आणि त्यामुळेच ते आत्महत्या करुन जीवन संपवितात, हेच यातून स्पष्ट होते़
तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अशोक किरनाळी यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गैरव्यवहार केला, त्यावेळी माजी उपविभागीय कृषी अधिकारी आबासाहेब साबळे यांनी अर्ज करुन शासनाकडे तक्रार केली तरी याकडे दुर्लक्ष केले़ निविष्ठा खरेदी पद्धत आणि निकृष्ठ प्रतीच्या निविदा खरेदी करुन जिल्हास्तरीय समितीची बैठक न घेता त्यांनी मनमानी पद्धतीने खरेदी केली़ या निविष्ठा खरेदीमध्ये १५ ते २० कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे.
-------------------------------
कृषी खात्यात भरडधान्य योजनेत २०:२०:०० चा पुरवठा निकृष्ट व जुन्या फाटलेल्या पोत्यात झाल्याचे सिद्ध झाले होते़ छापील किंमत कमी असताना जादादराने त्या खरेदी केल्या जातात़ निविष्ठा खरेदीप्रकरणी संचालक डॉ़ एस़ एम़ अडसूळ यांच्या पथकाने चौकशी केली. अधिकाऱ्यांचे ४ एप्रिल २०१३ रोजी जबाबही नोंदविले. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक, तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अशोक किरनाळी वगळता यामध्ये दुसरे कोणी दोषी आढळले नाहीत़ अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला; मात्र तो आजतागायत ‘सापडत’ नाही हे विशेष़