व्याजासह कर्ज फेडूनही तगादा लावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:07+5:302020-12-11T04:49:07+5:30
बार्शीतील तीन खाजगी सावकारांकडून २० टक्के व्याजदराने घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनही शिविगाळ, दमदाटी करीत जीवे ...

व्याजासह कर्ज फेडूनही तगादा लावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
बार्शीतील तीन खाजगी सावकारांकडून २० टक्के व्याजदराने घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनही शिविगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन सावकारांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत व्यवसायधारक विकास बळवंत शेटे (वय ५२, रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. आकाश नारायण मस्के (रा.राऊत चाळ), जयपाल विश्वनाथ वाघमारे (रा.अलिपूर रोड), प्रसन्नजित गौतम नाईकनवरे (रा. भीमनगर, बार्शी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शेटे हे इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. साहित्य खरेदीसाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी आकाश मस्के याच्याकडून १४ लाख रुपये २० टक्के दरमहा दराने व्याज दराने कर्ज घेतले होते. त्याच्या कर्जाची परतफेड म्हणून व्याजासह २० लाख फेडले. मात्र, मस्के याने ५३ लाख रुपये थकबाकी दाखवली. त्याचे व्याज देण्यासाठी शेटे यांनी जयपाल वाघमारे यांच्याकडून २५ मे रोजी २ लाख दरमहा २० टक्के दराने घेतले. त्यापोटी फिर्यादीने जयपालला ४.५ लाख दिले. तरीही जयपालने आठ लाख रुपये थकबाकी सांगितली. तसेच प्रसन्नजीत नाईकनवरेकडून ३१ ऑगस्ट रोजी दीड लाख रुपये १५ टक्के व्याजदराने घेतले होते. त्याने हात उसनवारीची पावती नोटरी केली होती. त्या नोटरीत दोन लाख रुपये लिहिले होते. पैशाची गरज असल्याने त्या नोटरीवर शेटे यांनी सही केली. अद्यापपर्यंत नाईकनवरे यास दीड लाख रुपये दिले असताना तो मुद्दल, व्याज व दंड मिळून १९ लाख रुपये शिल्लक राहिल्याचे सांगत आहे.
तिघांनी लावलेला तगादा आणि धमक्यांना कंटाळून फिर्याद दिली.