कोरोनाच्या भीतीमुळे सोलापूर शहरातील रक्तदानाचे प्रमाण ७० टक्के घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 01:23 PM2020-10-01T13:23:27+5:302020-10-01T13:25:12+5:30

स्वेच्छा रक्तदाता दिन विशेष; कोरोनाची भीती हे प्रमुख कारण; जनजागरण करण्याची गरज

Corona reduced blood donation in Solapur by 70 per cent | कोरोनाच्या भीतीमुळे सोलापूर शहरातील रक्तदानाचे प्रमाण ७० टक्के घटले

कोरोनाच्या भीतीमुळे सोलापूर शहरातील रक्तदानाचे प्रमाण ७० टक्के घटले

Next
ठळक मुद्देथॅलेसेमिया असलेल्या मुलांना नियमितपणे रक्त लागते. त्यांची गरज भागविणे हे देखील मोठे आव्हान आहेमेडिकल हिस्ट्री, ताप, सर्दी, खोकला, रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण हे पाहिल्यानंतरच रक्त घेतले जाते

सोलापूर : कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील नागरिक रक्तदान करण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे रक्तपेढ्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील वर्षाशी तुलना करता यंदा ७० टक्क्यांपेक्षा कमी रक्तदान झाल्याचे रक्तपेढ्यांनी सांगितले.

शहरात तीन ते चार हजार ऐच्छिक रक्तदाते आहेत. रक्तपेढीकडे असलेल्या यादीतून १०० जणांना फोन करून रक्तदानाबद्दल विचारणा केल्यास फक्त पाच जणच तयार होतात. थॅलेसेमिया असलेल्या मुलांना नियमितपणे रक्त लागते. त्यांची गरज भागविणे हे देखील मोठे आव्हान आहे. रक्तदान करताना रक्तदात्याची पूर्ण तपासणी करण्यात येते. मेडिकल हिस्ट्री, ताप, सर्दी, खोकला, रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण हे पाहिल्यानंतरच रक्त घेतले जाते. 

अन्न व औषध विभागाने शिबिरे घ्यावीत
अन्न व औषध विभागाने पुणे विभागातील सर्वच रक्तपेढ्यांना शिबिरे आयोजित करण्यास सांगितले होते. जुलै महिन्यापासून रक्तदान शिबिरे खूप कमी प्रमाणात आयोजित करण्यात आली आहेत. कोविड-१९च्या परिस्थितीत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना रक्त व रक्तघटक तत्काळ मिळणे गरजेचे असल्याने रक्तदान शिबिरे घ्यावीत. याचा अहवाल सादर करावा, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने रक्तपेढ्यांना दिले आहेत.

रक्तदानासाठी आम्ही आवाहन करत आहोत. पण, म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. दरवर्षी सप्टेंबरमध्ये शाळा, महाविद्यालये सुरू असतात. शिक्षक, विद्यार्थी हे रक्तदान करतात. मात्र, शैक्षणिक संस्था सुरू नसल्याने या अडचणी निर्माण होत आहेत. तुटवडा कमी करण्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे.
-अशोक नावरे, प्रशासकीय अधिकारी, गोपाबाई दमाणी रक्तपेढी

दर महिन्याला २५ ते ३० शिबिरे घेण्यात येतात. सप्टेंबरमध्ये फक्त नऊ शिबिरे झाली. मागील ४ महिन्यांपासून अशीच परिस्थिती आहे. आमच्याकडे थॅलेसेमियाची १२५ दत्तक मुले आहेत. त्यांना रक्त दिल्यानंतर इतर रुग्णांसाठी रक्त कमी पडते. म्हणून नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान करावे. 
-डॉ. शैलेश पटणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी.

Web Title: Corona reduced blood donation in Solapur by 70 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.