विकासाच्या बळावर काँग्रेसची बाजी

By Admin | Updated: October 21, 2014 14:00 IST2014-10-21T14:00:54+5:302014-10-21T14:00:54+5:30

आ. प्रणिती शिंदे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना मतदारांनी कौल दिला तर एआयएमआयएम व सेनेला धक्का दिला. यात मोदी लाटही ओसरून गेली.

Congress's stand on development | विकासाच्या बळावर काँग्रेसची बाजी

विकासाच्या बळावर काँग्रेसची बाजी

जगन्नाथ हुक्केरी■ सोलापूर

 
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसला हादरा बसणार, असे भाकीत व्यक्त होत होते. मात्र आ. प्रणिती शिंदे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना मतदारांनी कौल दिला तर एआयएमआयएम व सेनेला धक्का दिला. यात मोदी लाटही ओसरून गेली. सगळ्यांच्या खिंडीत एकाकी अडकलेल्या प्रणिती शिंदे यांनी मात्र वैयक्तिक जनसंपर्क आणि विकासकामांवर बाजी मारली.
लोकसभेत हादरा बसल्यानंतर नेहमी सोबत असणारे कोठे यांनी काँग्रेसला हात दाखवत सेनेत दाखल झाले. त्यांचा रोष शमविण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते धजले नाहीत. त्यानंतर एकेकाळचे सुशीलकुमार शिंदे यांचे स्नेही विष्णुपंत कोठे यांनीही पुत्रप्रेमापोटी मैत्रीचा धागा तोडून शिवधनुष्य हाती घेतले. 
आघाडी तुटल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घातले तर माजी मंत्री देवकते यांनीही घड्याळालाच पसंती दिली. यामध्ये शहर मध्यमध्ये आ. प्रणिती शिंदे यांचे काय होणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र आ. शिंदे यांनी एकाकी प्रचाराची खिंड लढवून काँग्रेसचा गड शाबूत ठेवत त्यावर काँग्रेसचा झेंडा फडकविला.
सुरुवातीला माकप, काँग्रेसमध्ये काट्याची लढत होईल, असे वाटत असताना मात्र निर्णायक मतांच्या बळावर एआयएमआयएमने ३७ हजार ९३८ मते घेऊन दुसरे स्थान मिळविले. मुस्लीम बहुल भागात एआयएमआयएमने चांगलेच मताधिक्य घेतले तर माकपला मात्र कामगारांच्या वास्तव्य परिसरात पिछाडीवर राहावे लागले. 
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची सोबत मुस्लीम समाजाच्या मतदारांनी सोडली आणि पर्याय म्हणून तौफिक शेख यांना मते टाकल्याने ते दुसर्‍या स्थानावर राहिले. प्रचारात आक्रमक भूमिका बजावूनही सेनेच्या महेश कोठे यांना तिसर्‍या स्थानावर राहावे लागले. तर मोदी लाट किंवा भाजपच्या भूमिकेमुळे भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की यांना अनपेक्षित २३ हजार ३३९ मते मिळाली. 
काँग्रेसला मुस्लीम भाग व हद्दवाढ भागातील काही नगरे वगळता रामवाडी, लिमयेवाडी, सेंटलमेंट, भैरू वस्ती, पारधी वस्ती, शहानगर, भूषणनगर, मोदी, सात रस्ता, होटगी रोड, अंत्रोळीकरनगर, कुमठा नाका, संजयनगर परिसरात मोठे मताधिक्य मिळाले आहे. संगमेश्‍वरनगर, मल्लिकार्जुननगर परिसरातील काही केंद्रावर सेनेने बाजी मारली आहे. 
एआयएमआयएमची एंट्री 
■ पहिल्यांदाच सोलापूरच्या राजकारणात उतरलेल्या एआयएमआयएमने प्रचार सभांद्वारे वातावरण पलटविले. यश नाही पण दुसर्‍या स्थानावर पोहोचून सोलापूरच्या राजकारणात शहर मध्यच्या माध्यमातून जोरदार एंट्री केली आहे. 
 
भाजपचा प्रभाव
■ महापालिकेत नगरसेविका असलेल्या प्रा. मोहिनी पत्की यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली. मात्र अपेक्षा नसताना व प्रचारात मोठी आघाडी घेतली नसतानाही त्यांना पडलेली मते ही निर्णायक आहेत. लोकसभेत भाजपचे शरद बनसोडे यांना मध्यमधून ७५ हजार १८१ मते पडली होती तर १९ हजार ३६८ चे मताधिक्य मिळाले होते. मात्र विधानसभेत युती तुटल्याने भाजपला २३ हजार ३३९ मतांवर समाधान मानावे लागले.
 
राष्ट्रवादी पिछाडीवर
■ शहर मध्य मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक असूनही विद्या लोलगे यांना फक्त ७७९ मते मिळाली. यामुळे पक्ष पदाधिकारी व नगरसेवकांची कामगिरी शरद पवार यांची सभा होऊनही सुमार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
माकपकडे दुर्लक्ष
■ सतत कामगारांच्या हितासाठी लढणार्‍या माकपचे नरसय्या आडम यांना सगळ्याच मतदान केंद्रावर फारच कमी मते मिळाली आहेत. कामगार हित, घरकूल व विविध योजनांसाठी सतत लढा देणार्‍या माकपकडे मतदारांनी यंदा दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Congress's stand on development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.