संस्थात्मक पडझडीने काँग्रेसला फटका..

By Admin | Updated: August 17, 2014 23:33 IST2014-08-17T23:29:57+5:302014-08-17T23:33:26+5:30

पृथ्वीराज पाटील : आत्मचिंतन करण्याची गरज

Congress collapses with organizational crisis | संस्थात्मक पडझडीने काँग्रेसला फटका..

संस्थात्मक पडझडीने काँग्रेसला फटका..

सांगली : वसंतदादा पाटील यांनी उभारलेल्या सहकारी संस्था, बँका तसेच शहरातील पतसंस्था बंद पडल्यामुळे सांगली शहर व परिसराची आर्थिक अधोगती झाली. त्यातच गटबाजीचाही फटका बसल्याने गेल्या २९ वर्षांत काँग्रेसला सांगली विधानसभा मतदारसंघात अपवाद वगळता यश मिळू शकले नाही, असे मत प्रदेश काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे पाहिले, तर या गोष्टी लक्षात येतील. सांगली विधानसभा मतदारसंघात कधीकाळी वसंतदादा पाटील ज्याला उमेदवारी द्यायचे, त्याचा विजय व्हायचा. पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनाही त्यावेळी संधी मिळत होती. १९८५ नंतर आजअखेर पक्षाला सांगली मतदारसंघात एक अपवाद वगळता विजय मिळू शकलेला नाही. त्याची अनेक कारणे आहेत.
कारखाना, सूतगिरणी, बँका, पतसंस्था या माध्यमातून वसंतदादांनी निर्माण केलेल्या सहकार चळवळीला मोठा धक्का बसला आहे. अनेक संस्था बंद पडल्याने हजारो लोकांचा रोजगार गेला. साहजिकच त्यांचा संताप पक्षावर निघाला. या बाबींवर कधीही गांभीर्याने विचार झाला
नाही.
अनेक वर्षांपासून काँग्रेसला गटबाजीचाही मोठा फटका बसला आहे. आजअखेर ही गटबाजी कायम आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या रोखण्यातही यश आलेले नाही. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो काही वर्षांपूर्वी ढासळला. त्यानंतर वारंवार पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे या गोष्टींचा विचार आता पक्षीय पातळीवर होणे आवश्यक आहे. त्याच त्या चेहऱ्यांना जनता वैतागली आहे. त्यांना नवा चेहरा हवा आहे.
गुणवत्ता पाहून पक्षाकडून उमेदवार निवडला जावा, अशी आमची मागणी आहे. काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मीही अर्ज दाखल केला आहे. उमेदवारांच्या संस्थात्मक, पक्षीय कार्याचा विचार करताना, तो स्वच्छ चारित्र्याचा, सुशिक्षित असावा, याचा विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress collapses with organizational crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.