थकित दंड वसुल करण्यासाठी उत्तरमधील सात गावातील 56 खाणधारकांच्या मालमत्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 21:05 IST2021-01-03T21:04:47+5:302021-01-03T21:05:08+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

थकित दंड वसुल करण्यासाठी उत्तरमधील सात गावातील 56 खाणधारकांच्या मालमत्ता जप्त
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील सात गावांतील ५६ दगडखाणधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे उत्तर सोलापूर तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले. दगडखाणधारकांनी विहीत मुदतीत दंड न भरल्यास त्यांच्या मालमत्तेची लिलावाव्दारे विक्री केली जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
याबाबत पाटील यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे, हगलूर, भोगाव, तळे हिप्परगे, शेळगी, रानमसले, कोंडी गावातील ५६ खाणधारकांनी अतिरिक्त गौण खनिज उत्खनन केले होते. त्यामुळे या खाणधारकांना १४८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यांनी अद्यापही दंड भरलेला नाही. दंड वसुलीसाठी खाणधारकांची मालमत्ता जप्त केली आहे. विहीत मुदतीत दंड नाही भरला तर जप्त करण्यात आलेली मालमत्तेची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर तहसील कार्यालयात लिलावाव्दारे विक्री केली जाणार आहे.