मुख्यमंत्र्यांना आवडली सोलापुरची भाकर अन शेंगाची चटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:17 IST2018-12-19T12:14:32+5:302018-12-19T12:17:13+5:30
महापौरांचा स्वयंपाक: विमानात आस्वाद

मुख्यमंत्र्यांना आवडली सोलापुरची भाकर अन शेंगाची चटणी
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरची शेंगाची चटणी, दही आणि भाकरीचा आस्वाद घेतला. सोमवारी ते सोलापूर दौºयावर आल्यावर महापौर शोभा बनशेट्टी यांच्या घरून त्यांना डबा देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सोलापूर दौºयावर आले होते. सकाळी विमानतळावर आगमन झाल्यावर ते पंढरपूरच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दुपारच्या भोजनाची तयारी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, अविनाश महागावकर यांच्याकडे होती. त्यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना डबा आणण्याची जबाबदारी दिली.
मुख्यमंत्र्यांसोबत विमानात खास त्यांचा स्वयंपाकी आला होता. त्याला महापौरांच्या घरी पाठविण्यात आले. त्यामुळे महापौर बनशेट्टी यांनी स्वत: लक्ष घालून स्वयंपाकाचा बेत केला. भरलेले वांगे, शेंगाची चटणी, दही, ताक, धपाटे आणि ज्वारीची भाकरी असा मेनू तयार करून डब्यात पाठविला. हा स्वयंपाक स्वत:च बनविल्याचे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्याच्या स्वयंपाकीजवळ हा डबा विमानतळाकडे पाठवूनच महापौर बनशेट्टी या पार्क स्टेडियममधील मेळाव्याच्या ठिकाणी आल्या. हा कार्यक्रम संपल्यावर मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाकडे रवाना झाले. सोलापूरहून विमान हैदराबाद व तेथून ते दिल्लीला गेले. विमानप्रवासात त्यांनी महापौरांच्या घरी तयार झालेल्या सोलापुरातील मेनूचा आस्वाद घेतला.