दरवाढीच्या निषेधार्थ सिमेंट खरेदी थांबविणार

By Admin | Updated: August 1, 2014 23:23 IST2014-08-01T22:27:48+5:302014-08-01T23:23:29+5:30

क्रिडाईचा इशारा :बांधकाम व्यावसायिकांनी केले ‘काम बंद’ आंदोलन

The cement purchase will be stopped by the price hike | दरवाढीच्या निषेधार्थ सिमेंट खरेदी थांबविणार

दरवाढीच्या निषेधार्थ सिमेंट खरेदी थांबविणार

कोल्हापूर : सिमेंट कंपन्यांनी प्रती पोत्यामागे ७० ते ८० रुपयांची केलेली दरवाढ अन्यायकारक आणि अव्यावहारिक आहे. त्याच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांनी ‘काम बंद’ आंदोलन केले. कंपन्यांनी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी आंदोलनाचा पुढील टप्प्यात बांधकाम व्यावसायिक सिमेंट खरेदी करणार नाहीत, अशी माहिती ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष गिरीश रायबागे व ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परिख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रायबागे म्हणाले, सिमेंट उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे २२५ ते २५० रुपयांपर्यंत असलेले सिमेंटच्या पोत्यांची किंमत ३१० ते ३६० रुपये झाली आहे. ही दरवाढ कृत्रिम स्वरूपातील आहे. त्याचा फटका बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, स्वत:च्या मालकीचे घर बांधणाऱ्यांना बसणार आहे. बांधकामाची किंमत प्रतिचौरस फूट ६० ते ७० रुपयांनी वाढणार आहे.
या कृत्रिम दरवाढीविरोधात ‘क्रिडाई’ने राज्यपातळीवर आंदोलन सुरू केले आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आज ‘काम बंद’ आंदोलन करण्यात आले. त्यात शहर आणि परिसरातील सुमारे १३० बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून बांधकाम व्यावसायिक सिमेंट खरेदी किमान एक महिना बंद करणार आहेत.
परिख म्हणाले, शासनाने या कंपन्यांवर दरवाढीबाबत निर्बंध घालावेत. सिमेंट कंपन्यांची दरवाढ आणि कार्टेलिंग विरोधात केंद्र सरकारच्या निकोप स्पर्धा आयोगाकडे ‘क्रिडाई’ने दाद मागितली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना घर बांधणे आणि व्यावसायिकांना योग्य दरामध्ये घरांचा पुरवठा करणे अशक्य होणार आहे. पत्रकार परिषदेस क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष महेश यादव, सचिव हेमांग शहा, राम पुरोहित, अभिजित मगदूम आदी उपस्थित होते.

हंगाम नसताना केली दरवाढ
कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक आणि स्वत: बांधकाम करणाऱ्यांकडून दरमहा सुमारे ५० हजार मेट्रीक टन सिमेंटची खरेदी केली जाते. मार्केटमध्ये सिमेंटचे दहा ब्रँड आहेत. त्यातील काही कंपन्यांनी एकत्रित येऊन हंगाम नसतानादेखील सिमेंटची दरवाढ केली असल्याचे राम पुरोहित यांनी सांगितले. ते म्हणाले, या दरवाढीमुळे बांधकाम व्यवसाय आणि घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

Web Title: The cement purchase will be stopped by the price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.