अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर पती, पत्नीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:32 IST2018-06-12T13:32:51+5:302018-06-12T13:32:51+5:30
वेळापुरातील प्रकार: २0१३ पासून नऊ गर्भपात केल्याचे उघड

अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर पती, पत्नीवर गुन्हा दाखल
वेळापूर : येथील आनंद दोशी व जयश्री दोशी या डॉक्टर पती-पत्नीने अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला.
वेळापूर येथील आनंद मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम, दोशी अल्ट्रासाउंड क्लिनिकचे डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी या पती- पत्नीवर रुग्णालयास गर्भपात केंद्राची मान्यता नसतानाही गर्भपात करत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमित अणदूरकर यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद जामदार व डॉ. अॅड़ रामेश्वरी माने यांनी रूग्णालयाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान हॉस्पिटलमध्ये २0१३ ते आजतागायत आठ ते नऊ गर्भपात केल्याचे आढळून आल्यानंतर तपासणी पथकाने आॅपरेशन थिएटर व प्रसूतीगृह, गर्भपाताची सामुग्री, चार बॉक्स मुदतबाह्य औषधसाठा सील केला़
पुणे जिल्ह्यातील तीन महिन्यांच्या गरोदर महिलेचा गर्भपात केल्यानंतर तिची तब्येत गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतरही तिची प्रकृती गंभीर बनल्याने या प्रकाराला वाचा फुटली. अकलूज येथील गर्भपाताचे प्रकरण जिल्हाभर चर्चेत असताना वेळापूर येथील या प्रकरणाने माळशिरस तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
- दवाखान्याच्या तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाºयांनी संबंधित आरोपी डॉ. पती-पत्नीस ताब्यात घेण्याची विनंती केल्यानंतर वेळापूरचे पोलीस अधिकारी जगताप यांनी अगोदर तुम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरच अटकेची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. रात्री उशिरापर्यंत तपासणी पथकाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. आरोपी डॉक्टर पती-पत्नी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाले.