५० खाटांची क्षमता; उपचार मिळाले १२० जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:05+5:302021-06-10T04:16:05+5:30

कोरोनाची दुसरी लाट नागरिकांसाठी अधिकच घातक ठरत होती. यामुळे खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणे सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांसाठी खर्चीक होते. ...

Capacity of 50 beds; 120 people received treatment | ५० खाटांची क्षमता; उपचार मिळाले १२० जणांना

५० खाटांची क्षमता; उपचार मिळाले १२० जणांना

Next

कोरोनाची दुसरी लाट नागरिकांसाठी अधिकच घातक ठरत होती. यामुळे खाजगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणे सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांसाठी खर्चीक होते. यामुळे अनेक रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालय हे गेल्या एक वर्षापासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांना सेवा देत आहे. योग्य उपचार देण्यासाठी रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. सचिन वाळुजकर, डॉ. शिवकमल व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड वॉर्डात काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. याचा परिणाम म्हणून पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील १४०० हून अधिक गोरगरीब रुग्णांना कोरोनाबाबत यशस्वी उपचार उपजिल्हा रुग्णालयात मिळाले.

उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे कोविड रुग्णालय असतानाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम व त्यांच्या टीमने अपुरे मनुष्यबळ, ऑक्सिजनची कमतरता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह असतानाही रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

‘नॉन रीब्रीदिंग मास्क पॅटर्न’ची दखल

ऑक्सिजनची बचत करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांच्या ‘नॉन रीब्रीदिंग मास्क पॅटर्न’चे राज्यभरात सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कोविड रुग्णांच्या उपचाराबरोबरच या ठिकाणी नॉन कोविड सेवाही अविरतपणे चालू आहे हे विशेष. राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी या सर्व कामकाजाची दखल घेत, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

१६ हजार संशयित रुग्णांची रॅपिड टेस्ट

पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात आजअखेर एकूण ७९९० जणांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व १६ हजारांहून जास्त संशयित रुग्णांची रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट करण्यात आली. रुग्णसेवा देत असताना अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविता आले, अशी समाधानाची भावना वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी व्यक्त केली.

फोटो : उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Capacity of 50 beds; 120 people received treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.