आठवणींना उजाळा; कुर्डूवाडी जंक्शनला चारवेळा लाभला बाबासाहेबांचा पदस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:10 PM2021-04-14T17:10:02+5:302021-04-14T17:10:08+5:30

माढा, मोडनिंब व बावीलाही दिल्या भेटी

Brighten memories; Babasaheb's inauguration at Kurduwadi Junction four times | आठवणींना उजाळा; कुर्डूवाडी जंक्शनला चारवेळा लाभला बाबासाहेबांचा पदस्पर्श

आठवणींना उजाळा; कुर्डूवाडी जंक्शनला चारवेळा लाभला बाबासाहेबांचा पदस्पर्श

googlenewsNext

कुर्डूवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३७ ते १९४१च्या दरम्यान एकूण चार वेळा कुर्डूवाडी रेल्वे जंक्शनमुळे शहराला वेगवेगळ्या कामानिमित्ताने भेटी दिल्या. त्यात एका भेटीदरम्यान तर त्यावेळच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने आमदारकी लढवत असलेल्या जिवाप्पा ऐदाळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने याबरोबरच कुर्डूवाडीशिवाय माढा, मोडनिंब व बावी या गावालादेखील त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यांच्या आठवणी आजही ऊर्जा देणाऱ्या ठरतात असे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. आशिष रजपूत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

 प्रा. डॉ आशिष रजपूत यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ साली पंढरपूर येथील दलित परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भल्या पहाटे ५ वाजताच ऐन थंडीत कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. त्यावेळी माढा तालुक्यातील अनुयायांनी फलाट तिकिटाविना मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर केली होती.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम जमा करण्यास सांगितले. काही वेळाने बाबासाहेबांमुळे तो प्रसंग विनाकारवाईवर अनुयायी पैसे देऊ शकत नसल्याने कसाबसा टळला. २२ फेब्रुवारी १९४१ साली बार्शी तालुक्यातील तडवळे (कसबे) येथील महार मांग परिषदेस जाण्यासाठी ते कुर्डूवाडी जंक्शनवर आले. यावेळी नागरिकांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. तेथील कार्यक्रम उरकून २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा माघारी येत असताना बार्शीतील नगर परिषदेच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या होस्टेलला मदत केली म्हणून त्यांनी तिथे जाऊन आभार मानले होते. त्यानंतर ते कुर्डूवाडीत पोहोचले. यावेळी येथील किसन सोनवणे व रेल्वे लाईट स्टाफच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुर्डूवाडीकरांनी १०१ रुपयांची देणगीदेखील  दिली होती. त्यांनी येथील सर्वांचे आभार मानले.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत अठरापगड जातींच्या शिलेदारांनी योगदान दिले. त्यात माढा तालुक्यातील चार जणांचा समावेश होतो. तेही आज हयात नाहीत. त्यात सोपान गंगाराम पोळ (कुर्डूवाडी), ठाकूजी सावळा जानराव गुरुजी (माढा), शिवमूर्ती मारुती रजपूत (रेल्वे कर्मचारी, कुर्डूवाडी), दलितमित्र केरुजी लंकेश्वर (माढा) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे चौघे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगदी जवळचे मानले जायचे. 

डॉक्टरांचा दौरा कुर्डूवाडीकडे निश्चित झाला की, या चौघांना स्वतः बाबासाहेब पहिल्यांदा कळवायचे. मग ते त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय नियोजित करीत असत. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी येथील संबंधित चौघे दुपारीच रेल्वेने मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी ठाकूजी जानराव व शिवमूर्ती रजपूत यांनी त्यांच्या अस्थी सोबत आणल्या होत्या.  त्या आजतागायत त्यांच्या घरात डबाबंद स्थितीत जतन करून ठेवल्या आहेत. 

कुर्डूवाडीत स्मारकासाठी पाठपुरावा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कुर्डूवाडी नगरीत त्यांच्या इतिहासाचे वर्णन केलेली कोनशिला किंवा मोठे सुसज्ज असे स्मारक रेल्वेस्थानकावर बसविण्यात यावे म्हणून येथील प्रा. डॉ. आशिष रजपूत हे रेल्वेच्या वरिष्ठांकडे सध्या पाठपुरावा करत आहेत. 
माढा न्यायालयात जमिनीचा दावा लढला
डॉ. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई या आजारी पडल्यानंतर काही दिवसांसाठी हवापालटासाठी माढा तालुक्यातल्या बावीत आल्या होत्या. त्याचबरोबर येथील मोडनिंब या गावातील कोठारी बंधूंच्या जमिनीच्या वादासंदर्भात माढा कोर्टात स्वतः हजर राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक केस लढवली आहे.

Web Title: Brighten memories; Babasaheb's inauguration at Kurduwadi Junction four times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.