वाळूजमध्ये हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:20+5:302021-02-05T06:46:20+5:30
वाळूज : शेतमजूर आईला भेटायला गेला... बैलांना चारा-पाणी घालणारा सोन्या आलाच नाही...सगळ्यांनी शोध घेतला...सायंकाळी वस्तीशेजारच्या मक्यात तो रक्ताच्या थारोळ्यात ...

वाळूजमध्ये हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मुलगा ठार
वाळूज : शेतमजूर आईला भेटायला गेला... बैलांना चारा-पाणी घालणारा सोन्या आलाच नाही...सगळ्यांनी शोध घेतला...सायंकाळी वस्तीशेजारच्या मक्यात तो रक्ताच्या थारोळ्यात आढळला...डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अन् वाळूजवर शोककळा पसरली. हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मरण पावल्याच्या घटनेने वाळूज गाव हादरून गेले आहे. या घटनेनंतर वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्याचा शोध घेण्यात यश आले नाही.
अनिकेत ऊर्फ सोन्या अमोल खरात असे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्याचे नाव आहे.
गावच्या उत्तर वाळूज-लडवळे रस्त्यावर खरात वस्ती आहे. भागवत रामचंद्र खरात यांची ही वस्ती असून, या वस्तीवर नेहमीच माणसांची वर्दळ असते. खरात यांना अमोल, अजित आणि अविनाश अशी तीन मुले. या तीनही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
मृत सोन्या ऊर्फ अनिकेत अमोल खरात (वय १०) यांच्यासह दोन लहान भावंडे २६ जानेवारी रोजी खेळत होती. घरातील इतर लोक हे शेती कामात गुंतलेले होते. शेतामध्ये दूरवर काम करणाऱ्या आईला अनिकेत भेटायला निघाला. जाताना इतर दोन भावंडांना आईला भेटायला जात असल्याची कल्पना दिली. तो गेला अन् परत आलाच नाही. तो काेणाला दिसलाही नाही.
वस्तीवरील कुत्री मोठमोठ्याने भुंकत असल्याने सोन्याची आई आणि चुलते अजित यांनी भावंडांना घेऊन त्याचा शोध घेतला. मक्याच्या दाट पिकात रक्ताच्या थारोळ्यात तो आढळून आला. त्याच्यावर हिंस्र प्राण्याचा हल्ला झाला असावा असा अंदाज आला. लागलीच त्याला उपचारार्थ मोहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच गावावर शोककळा पसरली.
----
घटनास्थळावरून ठसे घेतले
बुधवारी सकाळी नऊ वाजता वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने प्राण्याच्या पायाचे ठसे घेतले. मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली, तसेच दुपारी दोन वाजता सोलापूर येथून डॉग स्कॉडला पाचारण केले; परंतु त्याचा फायदा होऊ शकला नाही. मोहोळचे आ. यशवंत माने यांनी खरात कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माजी सभापती सुशांत कादे, विजय पोतदार, प्रकाश मोटे यांनी खरात कुटुंबाला धीर दिला.
----
फोटो : २७ अनिकेत खरात