'त्या' पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू'मुळेचं, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 14, 2025 11:55 IST2025-03-14T11:55:40+5:302025-03-14T11:55:48+5:30

भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आले आहेत.

birds died due to bird flu, says Bhopal lab report in solapur | 'त्या' पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू'मुळेचं, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल

'त्या' पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू'मुळेचं, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल

सोलापूर : मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज तलाव तसेच किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक यांचा मृत्यू झाला होता. या अनैसर्गिक मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळाकडून अहवाल प्राप्त झाला आहे.

भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आले आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. 

शहरातील दोन्ही बाधित परिसरांची दोन टक्के सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट यांचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्षांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यक म्हणून मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले आहे. दोन्ही तलाव परिसरातील शून्य ते एक किलोमीटर त्रिजेच्या बाधित क्षेत्रात व शून्य ते दहा किलोमीटर त्रिजेच्या सर्वेक्षण क्षेत्रात कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

तीन फूट खड्डा करून मृत पक्षांना पुरावे

पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्षांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत. त्याचा अहवाल प्राप्त करून घ्यावा असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चूना पावडर व पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावी. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्यास आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: birds died due to bird flu, says Bhopal lab report in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.