सोलापूर : कोरोनामुळे दीड महिन्यांपासून कडक लॉकडाउनला सामोरे गेलेले सोलापूर शहर व्यापारी- लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे शुक्रवारपासून (ता. ४) अनलॉक झाले आहे. याअंतर्गत कोविडविषयक निर्बंधांमध्ये अंशत: शिथिलता मिळणार असून सर्व दुकाने, बाजारपेठा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू करण्यात आल्याचा आदेश गुरुवारी रात्री उशिरा महापालिका आयुक्तांनी काढला आहे.
आदेशानुसार शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवण्यास तर, अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने सोमवार ते शुक्रवार यादिवशी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांतील मालक व कामगारांना कोविड चाचणी वा लसीकरण बंधनकारक आहे. बॅंकांच्या कामकाजाची वेळ देखील सात ते दोनपर्यंत राहणार आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे पार्सल सेवेसाठी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत त्यांना घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.