मोठी बातमी; २० जानेवारीपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची गरज नसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 16:37 IST2021-01-11T16:26:42+5:302021-01-11T16:37:15+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोठी बातमी; २० जानेवारीपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाइन पासची गरज नसणार
पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना २० जानेवारी पासून ऑनलाइन पासची गरज नसणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते भक्त निवास येथे घेण्यात आली. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध करून देताना करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पडलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
१२ जानेवारीपासून रोज ८ हजार भाविकांना विठ्ठल रुक्मिणी दर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांनतर २० जानेवारीपासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळेल. मात्र कोरानाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येणार आहे. यामुळे लहान मुले, ६५ वर्षापुढील लोक व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबर भाविकांना ओळख पत्राची आवश्क असणार आहे. तसेच पूर्वी प्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग करून देखील भाविक त्यांच्या वेळेनुसार दर्शनासाठी येऊ शकतात, असे ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
संक्रांतीनिमित्त मंदिरात रुक्मिणी मातेला वाणवसा करायला बंदी....
संक्रांतीनिमित्त स्थानिक महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु कोराना असल्यामुळे मंदिरात रुक्मिणी मातेला वाणवसा करू दिला जाणार नसल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.