वारकऱ्यांचे भजन आंदोलन
By Admin | Updated: August 5, 2014 23:36 IST2014-08-05T22:02:16+5:302014-08-05T23:36:43+5:30
सांगलीत निदर्शने : पंढरपुरातील सीसी टीव्हीप्रश्नी निवेदन

वारकऱ्यांचे भजन आंदोलन
सांगली : पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात नऊ कोटी रुपये खर्चून सीसी टीव्ही कॅमेरे बसवले असून, यासाठी बॅकअप, मेमरी कार्डची सोय नसल्यामुळे याचा हेतूच असफल झाला आहे. बॅकअप, मेमरी कार्ड त्वरित बसवण्यात यावे, या मागणीसाठी आज (मंगळवार) श्रीसंत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगलीवाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी निदर्शनेही करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व विश्वास गवळी यांनी केले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; मात्र त्याला बॅकअप व मेमरी कार्ड नसल्यामुळे कॅमेरे बसवण्याचा हेतूच सफल होत नाही. वारकऱ्यांच्या व मंदिर सुरक्षेच्या कारणासाठी करण्यात आलेला हा खर्च वाया गेला आहे. एखादी घटना घडल्यास कॅमेऱ्याचे फुटेज जतन करणे आवश्यक आहे. कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण व ते जतन होण्यासाठी मेमरी कार्डची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यामुळे मंदिर सुरक्षिततेच्या दृष्टीने मदतच होणार आहे. याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पृथ्वीराज पवार, हरिदास पाटील, लक्ष्मण नवलाई, लक्ष्मण हरुगडे, विजय म्हैसकर, दत्तात्रय आंबी, दिलीप सूर्यवंशी, विजय लोळगे आदी वारकरी, भाविक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)