खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!
By Admin | Updated: January 24, 2017 19:39 IST2017-01-24T19:39:08+5:302017-01-24T19:39:08+5:30
खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!

खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!
खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!
सोलापूर : नावाबाबत गुप्तता राहत नसल्याने आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यास नागरिक पुढे येत नसल्याचे निदर्शनाला आल्यावर मोबाईल अॅपवर तक्रार करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध केली आहे.
तक्रारदाराचे नाव गोपनीय राहत नसल्याने आचारसंहिता भंगाबाबत माहिती देण्यास कोणी पुढे येत नाहीत. याशिवाय तक्रार दिली तरी त्यावर कारवाई होण्याबाबत साशंकता निर्माण होत असल्याचे निदर्शनाला आल्यावर निवडणूक आयोगाने ही कमतरता दूर करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. सामान्य जनतेला आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यासाठी ‘कॉप’ नावाचे (सिटीझन्स आॅन पॅट्रोल) मोबाईल अॅप उपलब्ध करण्यात आले आहे. मनपा निवडणूक कार्यालयास या अॅपचा प्रसार करून नागरिकांचा सहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कॉप हे स्मार्टफोन वापरणाऱ्यास सहजपणे डाऊनलोड करता येईल. या अॅपमध्ये मोबाईल धारकास आपले नाव गुप्त ठेवून आचारसंहिता भंग होत असलेल्या ठिकाणावरून तक्रार नोंदविता येईल. कॉपवर ही तक्रार नोंदविल्यावर घटनास्थळाच्या दोन किलोमीटर परिसरात हजर असणाऱ्या सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तक्रारीचा तपशील मोबाईलवर प्राप्त होईल. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करायची जबाबदारी दिली गेली आहे. नागरिकांच्या हातात असलेल्या मोबाईलचा त्यांच्यावर वॉच राहणार असल्याने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक उमेदवारावर राहणार आहे.
छायाचित्राद्वारे मिळणार स्थळ
४कॉप हे अॅप्लिकेशन नागरिकांना गुगल किंवा प्लेस्टोअरमधून सहजरीत्या डाऊनलोड करता येईल. आचारसंहिता भंग होत असल्याचे छायाचित्र या अॅपवर टाकल्यावर लागलीच जीपीएस लोकेशनद्वारे स्थळ व आचारसंहिता भंगाचा प्रकार समजतो. संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे या तक्रारीची माहिती मिळते. यावरून केलेली कारवाई पुन्हा त्या अॅपवर लोड केली जाणार आहे. पैसे, भेटवस्तू, दारू वाटप करताना असे छायाचित्र काढून अॅपवर टाकल्यास परिणामकारक कारवाई होणार आहे.