सोलापूर शहरातील घंटागाड्या, आरोग्य विभागाच्या रूग्णवाहिका डिझेलअभावी जागेवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:55 IST2020-07-06T12:52:05+5:302020-07-06T12:55:18+5:30
महापालिकेच्या कारभारावर नगरसेवकांची ओरड; डिझेल टँकरचे लॉक गहाळ झाल्याने निर्माण झाली परिस्थिती

सोलापूर शहरातील घंटागाड्या, आरोग्य विभागाच्या रूग्णवाहिका डिझेलअभावी जागेवरच
सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील रूग्णवाहिका, घंटागाड्या रविवारी दुपारपासून डिझेलअभावी जागेवर थांबल्या आहेत़ सोमवारी सकाळी घंटागाड्या न आल्याने नगरसेवकांनी चौकशी केल्यावर कंपनीतून डिझेल घेऊन आलेल्या टँकरचे लॉक गहाळ झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी व सोमवारी सकाळी शहर वहात वाट भागात अनेक ठिकाणी घंटागाड्या कचरा संकलनासाठी आल्या नाहीत त्यामुळे लोकांनी ओरड केल्यावर नगरसेवकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. शहरातील अनेक घंटागाड्या, रूग्णवाहिका व प्रतिबंधित क्षेत्रात फवारणीसाठी लागणारे ट्रॅक्टर डिझेल न मिळाल्याने रविवारी दुपारपासून जागेवर थांबून असल्याचे सांगण्यात आले. डिझेलचा तुटवडा कसा निर्माण झाला याची महानगरपालिका परिवहन खात्याकडे चौकशी करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या परिवहन विभागातील पंपातून इंधन उपलब्ध केले जाते. रविवारी येथील पंपामध्ये डिझेल भरण्यासाठी कंपनीकडून डिझेलचा टँकर आला, पण लॉक बदलल्यामुळे पंपाच्या टाकीत डिझेल भरता आले नाही. सोमवारी सकाळी लॉक आणून डिझेल भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. डिझेल उपलब्ध होईल तसे गाड्या पाठविण्यात येत असल्याचे उपायुक्त अजयसिंह पवार यांनी सांगितले़