निसर्गाचे माळी व्हा... ‘माळीण’ टाळा

By Admin | Updated: July 31, 2014 23:26 IST2014-07-31T22:25:35+5:302014-07-31T23:26:46+5:30

कुठेतरी चुकतंय : भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा स्वभाव ओळखूनच विकास हवा

Become a gardener of nature ... Avoid 'Malin' | निसर्गाचे माळी व्हा... ‘माळीण’ टाळा

निसर्गाचे माळी व्हा... ‘माळीण’ टाळा

सातारा : ठोसेघर रस्त्यावरच्या बोरणे घाटातच दरवर्षी दरड का कोसळते? महाबळेश्वर-पाचगणी भागातच जमीन खचण्याचे प्रकार का वाढत आहेत? भेकवली, बोर्गेवाडी, चेवलेवाडी, काळोशी, रुईघर, शिंदेवाडी, जावळेवाडी, मोरघर, गुजरवाडी, मोरखिंड या गावांची अवस्था अखेर ‘माळीण’सारखी होणार का? असल्यास या परिस्थितीला केवळ निसर्गच जबाबदार आहे की आपणही?
जगाच्या नकाशावरून रातोरात अदृश्य झालेल्या माळीण गावानं सातारकरांपुढे असे अनेक यक्षप्रश्न निर्माण केले आहेत आणि त्यांची उत्तरं शोधताना प्रामाणिकपणा दाखविला गेला नाही, तर धडगत नाही, असा स्पष्ट इशाराही आता भूरचनाशास्त्रातील तज्ज्ञ देत आहेत. नैसर्गिक संसाधनांचा स्वभाव समजून न घेता मानवी हस्तक्षेप होत राहिले, तर कितीतरी गावांचे ‘माळीण’ होऊ शकते, असं त्यांचं ठाम प्रतिपादन आहे. सातारा जिल्ह्याचा किंबहुना सह्याद्रीचा विचार करता निसर्गातील हस्तक्षेप लपून राहिलेले नाहीत. शेकडो वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या डोंगरी ग्रामस्थांना अचानक चकाचक रस्ते बांधून देण्यात आले. वस्तुत: ते पवनचक्क्यांची अवजड वाहतूक करण्यासाठी होते, हे उघड गुपित आहे. डोंगर उभे कापून हे रस्ते काढले गेले. त्यासाठी झाडं-झुडपंही भुईसपाट केली गेली. एवढं करून हाती काय लागलं, असा प्रश्न तज्ज्ञांना पडलाय. जिल्ह्यात साडेतीन ते साडेचार हजार पवनचक्क्या आहेत. प्रत्येक चक्कीतून एक मेगावॉट गृहीत धरलं तरी कितीतरी वीजनिर्मिती व्हायला हवी होती; परंतु हे आकडे गुप्त का ठेवले जातात, असा त्यांचा सवाल आहे. अर्थकारण आणि कार्यकर्त्यांची सोय, एवढाच हिशेब अनेकांना यामागे दिसतो.
माती, खडक, डोंगर, वाळू, पाणी ही सगळी नैसर्गिक संसाधनं आहेत आणि प्रत्येकाला त्याचा ‘स्वभाव’ आहे. हा स्वभाव कायम बदलत असतो, हे लक्षात घेऊनच निसर्गात ढवळाढवळ करावी, अशी माफक अपेक्षा पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. घाटरस्त्यांची कामं करताना डोंगर उभे कुरतडले जातात. त्यासाठी अवजड यंत्रसामग्री आणि ‘व्हायब्रेटर’ वापरले जातात. त्यामुळं डोंगराच्या आतील खडक सुटे आणि भुसभुशीत होतात. बोरणे घाटात रस्त्यासाठी कडे खालच्या बाजूनं कापले गेले; म्हणूनच वरचा भार सहन न झाल्याने पावसाळ्यात दरड कोसळते, असा त्यांचा दावा आहे. डोंगराला एकीकडे असे उभे छेद दिले जात असतानाच विविध कारणांसाठी आडवं सपाटीकरणही ठिकठिकाणी दिसून येतं. धनाड्यांची फार्म हाऊस, वीकेन्ड होम डोंगर कुरतडूनच बांधली गेली आहेत. रुईघरपासून कासपर्यंत हेच पाहायला मिळतं. पाटण तालुक्यात काही ठिकाणी पुनर्वसित गावठाणांमधील लोकांना डोंगरावरील जमीन सपाट करून भातशेतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वस्तुत: उतारावर चिवट मूळ असणाऱ्या नाचणीचं पीक घेऊन उत्पादन मिळविण्याबरोबरच धूपही रोखणं शक्य होतं.
याबरोबरच अनियंत्रित पर्यटन, जमीनवापरातील बदल, वणवे, निर्वनीकरण अशा अनेक कारणांनी आपण संकट ओढवून घेत आहोत. वेळीच हे रोखलं नाही तर अनेक ठिकाणी ‘माळीण’ घडणार आहे. (प्रतिनिधी)

माळीण आणि भेकवली... फरक काय?
सह्याद्री जरी एक असला, तरी त्यातील खडक-मातीत फरक आहे. पश्चिमेकडे लॅटराइट म्हणजेच जांभा, तर पूर्वेकडे बेसाल्ट खडक आहे. जांभा खडकात लोहाचे प्रमाण अधिक असून, पाणी धरून ठेवण्याची क्षमता या खडकापासून निर्माण झालेल्या मातीत अधिक आहे. माळीण गावात खडकामधील माती सुटी झाली. पाण्याच्या ओघाने ती वाहून आली. मातीचे कण, खडे परस्परांच्या जवळ जाण्याऐवजी एकमेकांपासून दूर होत गेले. परिणामी कडा सुटा होऊन कोसळला. भेकवलीत किंवा काही वर्षांपूर्वी भिलारमध्ये झालेली घटना काहीशी तशीच असली, तरी त्यात फरक आहे. खडक आणि मातीच्या थराच्या मध्ये जेव्हा पाणी शिरतं, तेव्हा माती वाहून जाऊन खडक खाली घसरतो. याला आपण जमीन खचणं, असं म्हणतो. महाबळेश्वर परिसरातील उंच कड्यांच्या खालील भेगांमध्ये निर्माण झालेली माती पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळं खडक असे खाली सरकतात. थोडक्यात माळीण गावात पाण्याने वंगणाचे काम केले. भेकवली किंवा भिलारमध्ये कड्याच्या खडकाच्या खालील भागातील माती वाहून गेली आणि कडाच खाली सरकला. त्यामुळे जमिनीवर भेगा पडल्या. या भेगांकडे काळजीपूर्वक पाहिल्यास भेगेची एक बाजू उंच आणि दुसरी सखल दिसून येते. अशा परिस्थितीमुळं संपूर्ण कडाच दरीत घसरून जाण्याचा धोका आहे.
निर्वनीकरण रोखलंच पाहिजे...
राज्याच्या भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असलंच पाहिजे, असा नियम आहे. हे प्रमाण ठरविण्यामागे एक चपखल शास्त्र आहे. झाडांची मुळं मातीला घट्ट धरून राहतात आणि धूप रोखली जाऊन भूस्खलनासारखे प्रकार टळतात, हे आपण जाणतोच. यापेक्षाही अधिक महत्त्वाचं एक काम वृक्ष करतात. डोंगरावर चढताना आधी आपल्याला गवत आणि झुडपं लागतात. जसजसे आपण वर-वर जाऊ तसतसे मोठमोठे वृक्ष दिसतात. यामागे निसर्गाची खास योजना आहे. अनेक किलोमीटरवरून पडणाऱ्या पावसाचा थेंब वृक्ष अंगावर झेलतो आणि फांद्या, पानं, खोडावाटे पाण्याचा वेग कमी करून ते जमिनीवर सोडतो. त्यामुळं माती वाहून जाण्याचं प्रमाण कितीतरी पटींनी कमी होतं. म्हणूनच वृक्षतोड, निर्वनीकरण रोखण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

घाटरस्त्यांचे रुंदीकरण आणि पवनचक्क्यांची उभारणी यासाठी प्रचंड अवजड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येतो. जेसीबी, पोकलॅन, व्हायब्रेटर, ब्रेकर अशा यंत्रांच्या कंपनांमुळे डोंगराच्या आतील भागात असणाऱ्या खडकांचे भंजन होते आणि त्याचे विलगीकरण होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया संथ असल्यामुळे धोका लगेच दिसत नाही. माळीणसारख्या घटनेनंतरच ते कळते.
- प्रा. आर. आर. ओहोळ, एलबीएस महाविद्यालय, सातारा
खडकाचे भंजन होऊन माती तयार करण्याचे कारखाने म्हणजे सह्याद्रीवरील सडे किंवा पठारे. ही माती जलस्रोतांद्वारे वाहून येऊन नदीकाठाने पसरते आणि वनस्पतींचा जीवनक्रम सुरू होतो. डोंगरउतारावर मात्र वृक्षराजीमुळे मातीचे वहन थांबविले जाते. वृक्षतोडीमुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होऊन भूस्खलनाचा धोका वाढतो.
- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा

 

जपानमध्ये आठ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला तरी दहा माणसे मरतात. भारतात सात रिश्टरचा भूकंप झाला तरी हजारो माणसे मरतात. निसर्गाला समजून घेऊन कामे करण्याची जपानी लोकांची इच्छाशक्ती आणि पायापुरते वहाण कापण्याची भारतीय वृत्ती यातच याचे रहस्य दडले आहे. प्रत्येक संसाधनाला त्याचा ‘स्वभाव’ असतो आणि त्याचा कल लक्षात घेऊनच विकास व्हायला हवा.
- प्रा. एम. के. गरुड, सद््गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कऱ्हाड

--डोंगरांवर लावलेले वणवे
--वृक्षतोड, निर्वनीकरण
--जमीनवापरातील बदल
--अनियंत्रित पर्यटन
--कडे कापून रस्ते रुंद करणे
--अनिर्बंध सपाटीकरण
--कडे कापण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर
--पठारी भागात मोठे खड्डे खणणे
--खोदकामासाठी ‘व्हायब्रेटर’चा वापर

निर्वनीकरण रोखलंच पाहिजे...

राज्याच्या भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असलंच पाहिजे, असा नियम आहे. हे प्रमाण ठरविण्यामागे एक चपखल शास्त्र आहे. झाडांची मुळं मातीला घट्ट धरून राहतात आणि धूप रोखली जाऊन भूस्खलनासारखे प्रकार टळतात, हे आपण जाणतोच. यापेक्षाही अधिक महत्त्वाचं एक काम वृक्ष करतात. डोंगरावर चढताना आधी आपल्याला गवत आणि झुडपं लागतात. जसजसे आपण वर-वर जाऊ तसतसे मोठमोठे वृक्ष दिसतात. यामागे निसर्गाची खास योजना आहे. अनेक किलोमीटरवरून पडणाऱ्या पावसाचा थेंब वृक्ष अंगावर झेलतो आणि फांद्या, पानं, खोडावाटे पाण्याचा वेग कमी करून ते जमिनीवर सोडतो. त्यामुळं माती वाहून जाण्याचं प्रमाण कितीतरी पटींनी कमी होतं. म्हणूनच वृक्षतोड, निर्वनीकरण रोखण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
 

Web Title: Become a gardener of nature ... Avoid 'Malin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.