Solapur Crime : बनावट आधारकार्ड तयार करून अवैधरीत्या भारतात प्रवेश करून बार्शीतील पंकजनगर येथे राहत असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस निरीक्षक सोनप जगताप यांनी पंकजनगर परिसरात बांगलादेशी नागरिकाकडून घुसखोरी व बनावट दस्तऐवज याच्या वापरासंदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही दहशतविरोधी पथक सोलापूर युनिट व बार्शी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
चौकशीत त्यांच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये रोख रक्कम १ लाख ४१ हजार रुपये रोख, ४६ हजारांचे मोबाइल, बनावट आधारकार्ड, बांगलादेशी कागदपत्रे मतदान कार्ड हे जप्त करण्यात आले. याप्रकरणी नजमा यासिन शेख (३३), रेहना बेगम समद शिकदर (३३), आरजिना खातून अनवर शेख (१६), शिखा शकीब बुहिया २३, शकीब बादशाह बुहिया (२३), शोएब सलाम शेख (२४) बांगलादेशीय पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. तर याच्या चौकशीत येथील पंकजनगर येथे वास्तव्य करण्यास मदत करणारे बार्शी येथील विशाल मांगडे, राणी पूर्ण नाव माहीत नाही व किरण परांजपे या सर्वांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात घुसखोरी या सर्व प्रकारांमुळे शहरात खळबळ उडाली असून बांगलादेशीय लोकांचे थेट बार्शी सारख्या ग्रामीण भागात देखील घुसखोरी करून वास्तव्य केले जात असल्याचे उघड झाले आहे. ही बाब अतिशय गंभीर म्हणावी लागेल यामध्ये या महिलांना बार्शी शहरात राहण्यासाठी मदत केलेल्या इतरही तीन लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.