संवेदना ठेवल्या जागृत; निराधार चिमुकल्यांना 'त्यांनी' दिला शैक्षणिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 08:51 IST2021-06-29T08:51:25+5:302021-06-29T08:51:50+5:30
पॉझिटिव्ह स्टोरी; जिल्हा व मंगळवेढा तालुका पोलीस पाटील संघटनेने दिला मदतीचा हात

संवेदना ठेवल्या जागृत; निराधार चिमुकल्यांना 'त्यांनी' दिला शैक्षणिक आधार
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे संसार उध्दवस्त झाले घरातील कर्ती व कुटुंबप्रमुख मंडळी मृत्यू पावली.यात अनेकजन निराधार झाली तर अनेकांची जीवनवाट बिकट करून ठेवली. मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथील गावचे पोलीस पाटील असणारे हणमंत कांबळे यांच्या निधनाने कांबळे कुटुंबाला मोठा आघात झाला. त्यांच्या निधनाने पोरक्या झालेल्या कुटुंबियाला दु:खावर मात करण्याचे बळ यावे मुलांना शैक्षणिक आधार मिळावा म्हणून सोलपुर जिल्हा व मंगळवेढा तालुका पोलीस पाटील संघटनेकडून त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेऊन मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी ६० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत घरी जाऊन देऊन सामाजिक संवेदना जागृत ठेवल्या आहेत.
गरीब परिस्थितीतुन कुटुंबाची गुजराण करणारे व कामात कर्तव्यदक्ष असणारे हणमंत कांबळे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चात दोन मुले, एक मुलीचे शैक्षणिक भविष्य अंधारमय झाले.आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रा शशांक गवळी यांनी पुढाकार घेतला सर्वांनी मिळून निधी एकत्र करून कुटुंबियाच्या हाती सुपूर्त केला.
भविष्यात कोणत्याही गोष्टीची अडचण आली तरी सम्पर्क करा. काहीही कमी पडू देणार नाही असा आश्वासक दिलासाही दिला. यावेळी चिमकुल्याच्या चेहऱ्यावर फुटलेले सिमतहास्य व पत्नीचा खुललेला चेहरा उपस्थिताचे मन हेलावुन गेला.
यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रा.शशांक गवळी, जालीहाळचे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ईश्वर यजगर , उपाध्यक्ष आनंद रायबान , महेश पवार, शिवकुमार पाटील, सावकर भुसे, दत्तात्रय पाटील, जवीर पाटील, पद्माकर बनसोडे, दादासाहेब थोरबोले, जोती कांबळे, संजय गरंडे, प्रशांत पाटील उपस्थीत होते.
.........................................
कुटुंबकर्ता गेल्याने त्यामागील कुटुंबाचे खूप हाल होतात . आमचा एक सहकारी कोरोनाने हिरावल्याने त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबासाठी आमच्या संघटनेतील सर्व सदस्यांनी ६० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देऊन सामाजिक भान जपले भविष्यातही त्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही
---प्रा शशांक गवळी
तालुकाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना मंगळवेढा