धार्मिक सण, उत्सव टाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST2021-07-22T04:15:10+5:302021-07-22T04:15:10+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. कोरोनाचा सद्य:स्थितीतला प्रादुर्भाव पाहता सर्वांनी शासकीय निर्देश पाळणे ...

धार्मिक सण, उत्सव टाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करा
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढू लागलेला आहे. कोरोनाचा सद्य:स्थितीतला प्रादुर्भाव पाहता सर्वांनी शासकीय निर्देश पाळणे बंधनकारक बनले आहे. गावात आयोजित करण्यात येत असलेल्या छोट्या-मोठ्या यात्रा-जत्रा व धार्मिक उत्सवांमध्ये प्रत्येकाने कोरोनाच्या कडक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून केले. कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात आणि युवा नेते अमोल नलवडे उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले, तालुक्यातील एकूण गावांपैकी ७२ गावे ही गेल्या आठवड्यात १२ जुलैपर्यंत कोरोनामुक्त झाली होती. पण, या आठवड्यात ग्रामीण भागात यात्रा व धार्मिक उत्सव सुरू झाल्याने रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. तालुक्यात ११७ गावांपैकी फक्त ४६ गावे ही सध्या कोरोनामुक्त आहेत. माढा तालुक्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकूण आरटीपीसीआर चाचण्या ४१ हजार १५९ झाल्या असून अँटिजन टेस्ट ह्या ९४ हजार ४३२ झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ५९१ तपासणी चाचण्या झाल्या आहेत. त्यातील १७ हजार ३० जण बाधित रुग्ण आढळले होते, त्यापैकी १६ हजार ३५९ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे. --- लसीकरणात माढा आघाडीवर माढा तालुका जिल्ह्यात लसीकरणात आघाडीवर आहे. २ लाख ३१ हजार ८६२ इतके आपले लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६१ हजार ४६१ लाभार्थी लोकांचे लसीकरण झाले आहे. जास्तीतजास्त कोविड लस मिळावी यासाठी आमदार बबनदादा शिंदे व मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. (वा. प्रा.)
---
फोटो : सभापती विक्रमसिंह शिंदे
200721\3901img-20210720-wa0450.jpg
सभापती विक्रमसिह शिंदे