Breaking; आषाढीवारी प्रतिकात्मकच; परवानगी असलेल्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:56 IST2021-06-30T16:52:15+5:302021-06-30T16:56:57+5:30
आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

Breaking; आषाढीवारी प्रतिकात्मकच; परवानगी असलेल्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश
पंढरपूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्कम स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपूरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे. कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालखी सोहळ्याबात शासनस्तरावर निर्णय घेण्यात आलेला असून, वारी प्रतिकात्मक स्वरुपात पार पाडण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. नगरपालीकेने वाखरी पालखी तळावरील अनावश्यक काटेरी झुडपे काढून स्वच्छता करावी, स्वछ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मंडपाची व्यवस्था करावी. प्रदक्षिणा मार्गावर आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती व तात्पुरते बॅरेकेटींक करावे. नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने परवानगी दिलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करावी. आरोग्य विभागाने ऑक्सिजन, रक्तपुरवठा, औषधसाठा मुबलक प्रमाणात राहिल याबाबत नियोजन करावे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे , अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.
मंदीर समितीने महापुजा व इतर विधी पार पाडताना योग्य नियोजन करावे. कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच शासकीय पुजेस उपस्थित राहणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. महावितरण विभागाने वारी कालावधीत वीज पुरवठा अखंडीत व सुरक्षित राहिल याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे अशा सूचनांही ढोले यांनी यावेळी दिल्या. यावेळी बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध , उपपा्रदेशिक आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.