टाकळीजवळ जलवाहिनी फुटली, बुधवारी सोलापुरात पुन्हा उशिरा पाणी येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 22:13 IST2020-10-20T22:12:58+5:302020-10-20T22:13:42+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

टाकळीजवळ जलवाहिनी फुटली, बुधवारी सोलापुरात पुन्हा उशिरा पाणी येणार
सोलापूर : महापालिकेची टाकळी ते सोरेगाव जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमाराला टाकळीजवळ फुटली. या पाइप लाइनच्या दुरुस्तीला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरातील बुधवारी उशिरा आणि विस्कळीत पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
टाकळी जलकेंद्रातून जुळे सोलापुरातील हायलेवल टाकीला पाणी पुरवठा होता. या टाकीवरुन जुळे सोलापूर, पूर्व भागासह विविध भागात पाणी सोडले जाते. टाकळी येथून येणारी पाइप लाइन कालबाह्य झाली आहे. वारंवार पाइप लाइन फुटण्याचे प्रकार घडतात. गेल्या २० वर्षांत ही जलवाहिनी बदलण्याचा प्रयत्नच झालेला नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसतोय.
मंगळवारी सायंकाळी टाकळी चौकाजवळ पाइप लाइन फुटली. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. हे वृत्त कळताच मनपाचे अधिकारी, कर्मचारी दुरुस्तीसाठी टाकळीजवळ पोहोचले. दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. बुधवारी ज्या भागात पाणी येणार आहे त्या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत असेल, असे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.