दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन
By काशिनाथ वाघमारे | Updated: December 11, 2023 16:56 IST2023-12-11T16:55:45+5:302023-12-11T16:56:09+5:30
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कामती बुद्रुक येथे दगडाला दुग्धाभिषेक घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन
सोलापूर : शेतकऱ्यांना दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतीपूरक पशू व्यावसायिकांना दुधाचे दर कमी झाल्याने नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. पेंडीचे व पशुखाद्य पदार्थासह वैरणीचे भाव खूप वाढले आहेत. यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने शासनाने दुधाचे दर त्वरित वाढवून किमान ३४ रुपये हमीभाव द्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कामती बुद्रुक येथे दगडाला दुग्धाभिषेक घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.साठी किमान ३४ रुपये १० पैसे दर निश्चित केला होता; परंतु आजच्या परिस्थितीत २७, २८ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे पशुखाद्यसह वैरणीचा खर्चही भागत नाही. म्हणून शासनाने तात्काळ किमान ३४ रुपये दर द्यावा, कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर खाली आले असल्याने कांद्याची निर्यात बंदी त्वरित उठवावी या मागणींसाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान मंडल अधिकारी बसवराज सालीमट, कामती पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी तालुकाप्रमुख अशोक भोसले, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक सिद्धाराम म्हमाणे, बाळासाहेब डुबे-पाटील, सरपंच प्रवीण भोसले, मोहोळ शहर प्रमुख सत्यवान देशमुख, उपतालुकाप्रमुख विनोद आंबरे, वाहतूक सेनेचे सोमनाथ पवार, विजय गायकवाड, संजय वाघमोडे, नरसिंग पाटील, मुकुंद आवताडे, सुभाष सरपळे, शरद गोरे, अर्जुन लोखंडे, समाधान भोसले उपस्थित होते.