...आणि माझं निसर्गाशी नातं जुळलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:25 PM2019-01-21T17:25:59+5:302019-01-21T17:27:57+5:30

मी मागील २२ वर्षे पक्षीनिरीक्षण आणि जंगल भ्रमंती करीत आहे. तसेच मागील ८ वर्षे वाईल्डलाईफ व निसर्ग फोटोग्राफी करीत ...

... and my relationship with my husband! | ...आणि माझं निसर्गाशी नातं जुळलं !

...आणि माझं निसर्गाशी नातं जुळलं !

Next
ठळक मुद्देफक्त छायाचित्रकाराकडे निसर्गातील क्षण कायमस्वरूपी टिपण्याची किमयानिसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवितो तेव्हा माझ्या मनाला आनंद मिळतो

मी मागील २२ वर्षे पक्षीनिरीक्षण आणि जंगल भ्रमंती करीत आहे. तसेच मागील ८ वर्षे वाईल्डलाईफ व निसर्ग फोटोग्राफी करीत आहे. मी मागे वळून पाहतो तसे मला लगेच तो दिवस आठवतो. जानेवारी १९९६  मधील एका रविवारी माझ्या परिचयाचे डॉ. बाहुबली दोशी यांचा ‘तू हिप्परग्याला येशील का?’ असा फोन आला.

मला वेळ होता म्हणून त्यांच्यासोबत हिप्परगा तलावाला भेट दिली. तलावाचे दुर्बिणीतून निरीक्षण करीत असताना मला अंदाजे अडीच ते तीन फूट उंच, सडसडीत, पांढरेशुभ्र आणि लाल पंख, लालसर लांब पाय, लालसर वाकडी चोंच, लांब व उंच मान असा पक्षी नजरेत आला. तो पक्षी एवढा आकर्षक आणि देखणा होता की बराचवेळ माझी नजर त्याच्यावरच खिळून राहिली कारण नकळत मी त्या पक्ष्याच्या प्रेमातच पडलो होतो. माहिती घेतल्यानंतर त्या पक्ष्याचे नाव रोहित पक्षी (फ्लेमिंगो) आहे असे कळले. 

तलाव आणि तलावाच्याभोवती असलेल्या निसर्ग परिसरात अनेक रंगीबेरंगी पक्षी, प्राणी, पक्ष्यांचा किलबिलाट, किनाºयावरील झाडी, झुडपे, पाण्याचा मंजुळ आवाज, तलावातील सुबक नाव, नावातील मासेमारी करणारी मंडळी, कोवळे सूर्यप्रकाश आणि गार वारा यामुळे माझ्या मनाला एवढा आनंद मिळाला आणि माझं निसर्गाशी एक घट्ट नातं जुळलं. मी मनात ठरविले की प्रत्येक रविवारी या तलावास भेट द्यायची आणि पुढेपुढे दर रविवारी हिप्परगा तलाव भेट अंगवळणीच पडली.  

मी जेव्हा या निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवितो तेव्हा माझ्या मनाला आनंद मिळतो. माझ्या मनाला शांती मिळते. पक्षी निरीक्षण हे एक प्रकारचे ध्यानच असते, कारण त्यामुळे माझ्या संपूर्ण आठवड्याचा सर्व कामाचा, शारीरिक आणि मानसिक ताण निघून जातो. पुढील दोन वर्षांमध्ये मी सोलापूर आणि नजीकच्या जिल्ह्यातील अनेक तलाव, पाणथळ, गवताळ प्रदेश, नदी आणि माळरान यांना भेट दिली. या दरम्यान निसर्गाकडून जीवन शांत आणि आनंदी कसे जगावे हे शिकलो.

निसर्गात अनेक तास मी माझ्याभोवती असलेल्या पक्षी आणि प्राणी यांच्या शरीराची रचना, त्यांचे रंग, त्यांचे वेगळेपण, त्यांच्या  हालचाली, त्यांचे व्यवहार, त्यांचे खाद्य अशा अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करीत आलोय.  निसर्गामधील  अनेक आश्चर्यकारक घटना माझ्या नजरेत आणि साध्या कॅमेºयामध्ये टिपल्या गेल्या. पक्षी आणि प्राण्यांपासून जगण्यासाठी फार कमी लागते हे शिकलो. हळूहळू  निसर्ग हा माझा गुरू बनला आणि मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकतोय. आता मी प्रत्येक माणसाने निसर्गाशी नाते जुळवावे आणि स्वत:चे जीवन आनंदमय आणि शांतीमय जगावे यासाठी प्रयत्न करतोय..

फक्त छायाचित्रकाराकडे निसर्गातील क्षण कायमस्वरूपी टिपण्याची किमया असते हे जसे कळले तेव्हा मी उत्तम प्रकारचे कॅमेरे घेतले. माझ्या कॅमेºयाबद्दल सर्व काही मी आपणास जरूर पुढील भागात सांगेन.
   - डॉ. व्यंकटेश मेतन
(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत)

Web Title: ... and my relationship with my husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.