सर्वच पक्ष म्हणतात, आरक्षण नसले तरी आमच्याकडे ओबीसी उमेदवारांची यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:03 IST2022-05-19T16:03:18+5:302022-05-19T16:03:21+5:30
सोलापूर महापालिका निवडणुकीची तयारी : राष्ट्रवादी काँग्रेस २० मे राेजी करणार आंदाेलन

सर्वच पक्ष म्हणतात, आरक्षण नसले तरी आमच्याकडे ओबीसी उमेदवारांची यादी तयार
राकेश कदम
साेलापूर : ओबीसी प्रवर्गाला मध्यप्रदेशात आरक्षण मिळते; पण महाराष्ट्रात मिळत नाही हे भाजपचे कारस्थान असल्याचा आराेप महाविकास आघाडीतील पक्ष प्रमुखांनी केला आहे. आरक्षण मिळवून देण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरल्याचा दावा केला. मात्र, सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षण मिळाले नाही तरी ओबीसी उमेदवारांना प्राधान्य देऊ, असा दावा केला आहे.
मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांना आणि ओबीसी उमेदवारांना धक्का बसला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी किमान ३१ जागा राखीव ठेवता येतील; परंतु सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गातून लढू इच्छिणारे उमेदवार नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने यावर आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० ते २५ ओबीसी उमेदवारांची यादी तयार आहे. या विषयावर आम्ही २० मे राेजी आंदाेलन करणार आहाेत. आरक्षण दिले नाही तरी या ओबीसी उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.
- भारत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
--
शिवसेनेतून अनेक ओबीसी प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढविण्यास तयार आहेत. खरे तर सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देशात लागू हाेताे; पण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका हाेत आहेत.
- पुरुषाेत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
--
माेदी सरकारमुळे महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. या निकालावरून माेदी सरकारचा डाव लक्षात येताे. काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी उमेदवारांची यादी तयार केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरच ही यादी जाहीर करता येईल.
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस
--
महाविकास सरकार आणि माेदी सरकारला ओबीसींबद्दल देणे-घेणे नाही. जाणूनबुजून यात राजकारण केले जात आहे. एमआयएम आगामी निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना निश्चितच प्राधान्य देणार आहे.
- फारुख शाब्दी, शहराध्यक्ष, एमआयएम
--
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात ओबीसींना आरक्षण मिळाले नाही. सरकारने इम्पिरिकल डेटा देण्यात केलेला हलगर्जीपणा याला कारणीभूत ठरला आहे; पण भाजप ओबीसींसाेबत आहे. आमच्याकडे यापूर्वीच ओबीसी उमेदवारांची यादी तयार आहे.
-विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप