विमानसेवेस हिरवा कंदील
By Admin | Updated: August 8, 2014 01:12 IST2014-08-08T01:12:06+5:302014-08-08T01:12:06+5:30
विजयसिंह मोहिते-पाटील : नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचना

विमानसेवेस हिरवा कंदील
अकलूज : सोलापूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजकांच्या सोईसाठी सुरू करण्यात येणाऱ्या सोलापूर-मुंबई विमान वाहतूक सेवेस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी हिरवा कंदील दाखविला असून अधिकाऱ्यांना या वाहतुकीसाठी तातडीने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
खा. मोहिते-पाटील म्हणाले, ‘सुप्रीम एअरलाईन्स’ या कंपनीच्या माध्यमातून १५ आॅगस्टपासून नियमित विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे नाहरकत प्रमाणपत्र हवे आहे.
त्यादृष्टीने आपण केंद्रीय मंत्री राजू यांची भेट घेतली व त्यांना या विमान वाहतुकीची व्यापारी, उद्योजक यांना किती गरज आहे हे पटवून दिले. राजू यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याविषयी सूचना केल्या. खासदारपदी निवड झाल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार खा. मोहिते-पाटील यांनी ‘सुप्रीम एअरलाईन्स’ या खासगी विमान कंपनीशी चर्चा केली. कंपनीचे अमित अग्रवाल यांनी सोलापूरसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार १५ आॅगस्टपासून सोलापूर-मुंबई ही ९ सीटची विमानसेवा सुरू होईल, असे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. परंतु केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ही सेवा सुरू करता येत नसल्यामुळे खा. मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री राजू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी खा. धनंजय महाडिक उपस्थित होते.
-----------------------------
सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक यांना विमानसेवेची गरज आहे, हे पटवून दिल्यानंतर राजू यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याविषयी सूचना केल्या. नियमित विमानसेवेमुळे सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीला गती मिळेल.
- विजयसिंह मोहिते -पाटील
खासदार, माढा