वयाच्या अठराव्या वर्षी राजुरीचा किशोर जाधव झाला मृदंग विशारद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:12 IST2019-08-05T15:10:23+5:302019-08-05T15:12:22+5:30
ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तनात त्याच्या पखवाजाचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रात घुमतो

वयाच्या अठराव्या वर्षी राजुरीचा किशोर जाधव झाला मृदंग विशारद
सुरेश साखरे
कोर्टी : करमाळा तालुक्यतील राजुरी या छोट्याशा गावातील कि शोर जाधव या शेतकरी पुत्राने पखवाज वादनात आपला ठसा उमटवला आहे. तो नुकताच मृदंग विशारद परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तनात त्याच्या पखवाजाचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रात घुमतो आहे.
राजुरी हे गाव करमाळा शहरापासून २७ किलोमीटर आणि उजनी बॅकवॉटरपासून ८ किलोमीटर अंतरावर आह़े गावात सिंचन क्षेत्र मर्यादित आहे़ येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात़ जेमतेम अडीच एकर शेतजमिनीवर या गावातील शेतकरी गजानन जाधव यांची उपजीविका आहे़ ही जमीन उजनी बॅकवॉटरपासून लांब असल्याने सिंचनाची सोय नाही. मात्र घरातील वातावरण संप्रदायाचे. याच वारकरी संप्रदायाने मृदंग विशारद अशी ओळख निर्माण करून दिली आहे़
त्याचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जि़ प़ शाळेत झाले़ त्याला लहानपणापासून वादनाची आवड होती़ त्याचे वडील गजानन जाधव यांनाही वादनाची आवड, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही कला जोपासता आली नाही़ स्वत:ची अपूर्ण इच्छा आपल्या मुलाच्या रूपाने पूर्ण व्हावी, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला बीड जिल्ह्यात लिंबा गणेश येथील मृदंग सम्राट पंडित केशव जगदाळे यांच्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये ठेवले़ त्यानंतर तेथील अभ्यास पूर्ण करून त्याने मुंबई येथे गांधर्व महाविद्यालयात परीक्षा देऊन मृदंग विशारद ही पदवी प्राप्त केली़
परराज्यातील सादरीकरणाने दिले व्यासपीठ
आज तो राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनात पखवाजवर साथ देत आह़े याबरोबरच त्याने धृपवादन व सोलोवादनात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे़ किशोरने आजपर्यंत इंदोरीकर महाराज, ढोक महाराज, इंगळे महाराज यांना कीर्तनात साथ केली आहे़ याबरोबरच त्याने परराज्यातही आपल्या वादन सादरीकरणातून ठसा उमटवला आहे़ व्यासपीठावर येण्यासाठी यातून त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली़