शिलाई मशीनचा गट्टू डोक्यात पडल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: September 10, 2023 16:51 IST2023-09-10T16:50:57+5:302023-09-10T16:51:04+5:30
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

शिलाई मशीनचा गट्टू डोक्यात पडल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
सोलापूर : शिलाई मशीनचा गट्टू डोक्यात पडल्याने दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार १० सप्टेंबर रोजी उघडकीस आली. नामदेव गणेश निंबाळकर (वय १०, रा, बोळकोटेनगर, एमआयडीसी ) असे मयत शाळकरी मुलाचे नाव आहे.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो घरात झोपला असताना घरातील लहान मुले खेळत असताना नामदेवच्या डोक्यावर घरातील शिलाई मशीनचा गट्टू पडला. यात नामदेवच्या डोक्यास, कपाळास मोठी जखम झाल्याने त्यास उपचारासाठी वडील गणेश निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचार सुरू असताना रविवारी दुपारी नामदेवचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. नामदेव हा पाचवीच्या वर्गात शिकत होता. तो अभ्यासात खूप हुशार होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी लोकमतला दिली.