Solapur Crime: अज्ञात चोरट्याने पोलिसाचे घर फोडून २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, पोलिस गणवेश असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज आणि शेजाऱ्याच्या घरातील ४० हजारांची रोकड असा एकूण नऊ लाखांचा ऐवज चोरून धूम ठोकली. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मळेगाव (ता. बार्शी) येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिस सेवेत असलेल्या संताजी अलाट यांच्या आई भागिरथी मधुकर अलाट यांनी पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.
फिर्याद दाखल होताच सकाळी पोलिस ताफ्यासह ठसे तज्ज्ञ, श्वानपथकास पाचारण केले होते. श्वान घरापासून पाचशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळत राहिले. फिर्यादीत म्हटले आहे की, मळेगाव येथील घरी रात्रीच्या नऊ वाजता फिर्यादीसह सर्वजण जेवण आटोपून झोपले होते.
फिर्यादीची दोन्ही मुले सरकारी नोकरी करत असून त्यातील संताजी हे वैराग पोलिस ठाण्यात पोलिस सेवेत आहेत. ते रात्री पावणेबारा वाजता घरी येऊन झोपले होते. पहाटेच्या सुमारास शेजारचे अमोल जामदार याने आवाज देऊन तुमच्या घराशेजारील घरांना बाहेरून कड्या घातल्या आहेत. तुमच्या किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटलेला दिसत आहे. सारे जागे झाल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाट उघडून पाहिले असता २१ तोळे सोन्याचे दागिने, ८ चांदीची भांडी, पाच हजार रुपये रोकड, यासह पोलिस गणवेश, कागदपत्रे असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तपासासाठी दोन पथके रवानाघटनेची माहिती मिळताच सपोनि हेमंतकुमार काटकर, हवालदार सचिन माने, शब्बीर शेख, तानाजी लोकरे, अभिजित जगदाळे, संगम वडले, ईश्वर कांदे, कृष्णा नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून तपासासाठी दोन पथके केली. त्यांना धाराशिव, तुळजापूर, ढोकी, मोहा, कळंब, वाशी, या भागात रखाना केले आहे.