ब्रिटीशकालीन डिकसळ पुलाच्या शेजारी भिमानदीवर नवीन पूल
By दिपक दुपारगुडे | Updated: November 26, 2023 15:35 IST2023-11-26T15:34:59+5:302023-11-26T15:35:37+5:30
सोलापुर-पुणे जिल्हयास जोडणाऱ्या डिकसळ पुलाचे काम सुरू

ब्रिटीशकालीन डिकसळ पुलाच्या शेजारी भिमानदीवर नवीन पूल
दीपक दुपारगुडे, सोलापूर: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भीमा नदीवरील डिकसळ पुलाचे काम पासुन सुरु झाले आहे. पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे.
सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन जुन्या रेल्वे लाईनवर डिकसळ (ता.इंदापूर) व कोंढारचिंचोली (ता.करमाळा) दरम्यान हा पुल होता. आठ महिन्यापूर्वी या पुलाच्या एका बाजूच्या बांधकामाचे काही दगड निखळले होते. त्यामुळे या ठिकाणी पुलावर मोठा बोगदा पडला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील जड वाहतूक बंद केली होती. डिकसळ पुलासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या कामासाठी निधी मिळाला आहे. तीन वर्षात या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांसाठी भिगवण, बारामती, दौंड, इंदापूरला जाण्यासाठी बाजारपेठेचा दळणवळणासाठी हा पूल महत्वाचा आहे. यापूर्वी येथे काम सुरु झाले होते मात्र काही अडचण आल्यामुळे काम थांबले होते. आता काम सुरु झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.