वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू, वन्यजीवप्रेमींचा आंदोलनाचा इशारा
By शीतलकुमार कांबळे | Updated: November 19, 2023 14:51 IST2023-11-19T14:51:20+5:302023-11-19T14:51:43+5:30
वन विभागाने याबाबत उपाययोजना न केल्या आंदोलनाचा इशारा वन्यजीवप्रेमींनी दिला आहे.

file photo
सोलापूर : मंगळवेढा परिसरात सोलापूर- मंगळवेढा रोडवर रविवार 19 नोव्हेंबर रोजी एका कोल्ह्याचा अपघाती मृत्यू झाला. मागील तीन दिवसात कोल्ह्याचा अपघातात मृत्यू होण्याची ही दुसरी वेळ आहे. वन विभागाने याबाबत उपाययोजना न केल्या आंदोलनाचा इशारा वन्यजीवप्रेमींनी दिला आहे.
सोमवार 13 नोव्हेंबर रोजी शिवानंद हिरेमठ हे मंगळवेढा येथे जात होते. त्यावेळी रस्त्यावर एक कोल्हा अपघातात मृत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर रविवार 19 नोव्हेंबर रोजी वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे सुरेश क्षीरसागर हे मंगळवेढा येत जात होते. त्यांना देखिल त्याच रस्त्यावर आणखी एक कोल्हा अपघातात ठार झाला. या आठवड्यात ही दुसरी घटना आहे. सध्या कोल्ह्याचे पिल्लं देण्याचा काळ असून मृत झालेल्या कोल्ह्याची पिल्लं असू शकतात, असे संतोष धाकपाडे यांनी सांगितले.
ज्या परिसरात ऊसाचे क्षेत्र जास्त असते, त्या परिसरात कोल्हा वास्तव करत असतो. ऊसामधील जागा लपण्यासाठी उपयुक्त असल्याने कोल्हा तिथे आसरा घेतो. तिथून पळत जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसोबत अपघात होतो. हे टाळण्यासाठी जागोजागी फलक लावण्याची मागणी केली आहे.
महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून वन्यजीवांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याची माहिती वन विभागाला दिली होती. महामार्गावर जाळी बसवावी, फलक लावावे अशी विनंती केली होती. मात्र, याबाबत उपाययोजना झाल्या नाही. त्यामुळे आंदोलन करणे हा पर्याय राहिला आहे.
- संतोष धाकपाडे, वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशन