चर्चा तर होणारच ना; करमाळा तालुक्यात म्हशीला चक्क पांढऱ्या रंगाचे रेडकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 18:38 IST2021-11-04T18:38:43+5:302021-11-04T18:38:53+5:30
शेटफळ येथील रोंगे यांच्या म्हशीचे रेडकू हे अल्बिनो बफेलो यांचा प्रकार असावा.

चर्चा तर होणारच ना; करमाळा तालुक्यात म्हशीला चक्क पांढऱ्या रंगाचे रेडकू
करमाळा : तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क पांढऱ्या रंगाचे रेडकू झाल्याने हा कुतूहल व चर्चेचा विषय ठरला आहे.
आरोग्यासाठी गुणवत्तापूर्ण व चविष्ट दुधासाठी अनेकजण म्हशीच्या दुधाला प्राधान्य देतात. या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणीही असते. देशात विशेषतः महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या जातींच्या म्हशी पाळल्या जात असल्या तरी त्यांचा रंग साधारणपणे काळा किंवा भुरा असतो. शेटफळ येथील शेतकरी मारुती रोंगे यांच्या म्हशीने चक्क पांढऱ्या रेडीला जन्म दिला. रोंगे यांनी आपल्या घरातील लहान मुलांना दुधाची गरज आसल्याने दोन महिन्यांपूर्वी पैलारू म्हैस खरेदी केली. ती म्हैस दोन दिवसांपूर्वी व्याली.
तिला म्हशीसारख्या रंगाचे रेडकू न होता गावरान गायीसारखी चक्क पांढऱ्या रंगाची रेडी झाली आहे. परिसरात म्हशींची संख्या भरपूर आहे. अनेक वर्षांपासून म्हशी सांभाळणारे शेतकरी आहेत. आजपर्यंत अशा प्रकारचे पांढऱ्या शुभ्र रंगाचे रेडकू कधीही पाहिले नसल्याचे ते सांगत आहेत. काही जणांनी कृत्रिम रेतन करताना झालेल्या चुकीच्या बीजामुळे असे झाले असावे, असा तर्क काढत जात आहे.
शेटफळ येथील रोंगे यांच्या म्हशीचे रेडकू हे अल्बिनो बफेलो यांचा प्रकार असावा. आपल्या देशात क्वचित अशी उदाहरणे होतात. अमेरिकेत व काही देशात हा प्रकार आढळतो. म्हशीच्या हार्मोन्समधील बदलामुळे अशी घटना होऊ शकते.
- अवधूत देवकर, पशुवैद्यकीय अधिकारी, जेऊर, ता. करमाळा.