ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 1, 2022 19:52 IST2022-12-01T19:51:27+5:302022-12-01T19:52:21+5:30
सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज
सोलापूर : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायत मध्ये निवडणुका सुरु असून १८९ सरपंच पदासाठी ४५५ गाव पुढाऱ्यांनी अर्ज दाखल केला आहे. तर ६४६ ग्रामपंचायत सदस्यासाठी दोन हजार तीनशे सात उमेदवार इच्छुक आहेत. शुक्रवार, २ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होणार आहे.
सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत. राज्यात सर्वत्र ही परिस्थिती असल्याने अनेकांनी निवडणूक आयाेगाकडे तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मूभा दिली. अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी, दुपारी साडे तीन पर्यंत मुदत होती. आता आयोगाने साडे पाच पर्यंत वेळ वाढवून दिली आहे. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
गुरुवारी, १ डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी २४७ उमेदवार तसेच सदस्य पदासाठी १४४४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. बुधवार ३० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने पोलिस बंदोबस्त मागवला आहे.