राज्यातील २० हजार विकास सोसायट्यांना आता खत विक्रीचे परवाने मिळणार, केंद्राच्या सहकार खात्याचा आदेश
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 24, 2023 17:48 IST2023-11-24T17:47:52+5:302023-11-24T17:48:24+5:30
राज्यातील २० हजार ८४४ विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. याच संस्थांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत.

राज्यातील २० हजार विकास सोसायट्यांना आता खत विक्रीचे परवाने मिळणार, केंद्राच्या सहकार खात्याचा आदेश
सोलापूर- केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील संगणकीकरण होत असलेल्या २० हजार ८४४ विकास सोसायट्यांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचा परवाना देण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात २२ विकास सोसायट्यांना सध्या परवाने देण्यात आले असून कृषी व सहकार खात्याच्या संयुक्त विद्यमाने हे काम राज्यभरात सुरू झाले आहे.
सेक्रेटरीच्या चिठ्ठ्या-चपाट्यावर सध्या विकास सोसायट्यांचा व्यवहार चालतो. तो संगणकीकरणाद्वारे ऑनलाईन करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन निधीही दिला. त्यातून राज्यातील २० हजार ८४४ विकास संस्था संगणकीकरण करण्यात येत आहे. याच संस्थांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत.
राज्यात ७७८ सोसायट्यांना खत दुकाने
राज्यातील ७७८ विकास सोसायट्यांना खत विक्रीचे परवाने दिले असून त्या- त्या गावात खत विक्री या विकास सोसायट्या करतात. सोलापूर जिल्हात २२ विकास सोसायट्यांना खत विक्रीचा परवाना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय संगणकीकरण होणाऱ्या नव्याने २० हजार विकास संस्थांना किरकोळ खत विक्रीचा परवाना दिला जात आहे. या परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रात रुपांतर होणार आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सुरुवातीला जिल्हातील २०० सोसायट्यांना किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत. तसे संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
- आबासाहेब गावडे
सहायक निबंधक, सहकारी संस्था सोलापूर