आधी चाकूने वार, मग केबल वायरने १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण; रुग्णालयात उपचार
By विलास जळकोटकर | Updated: September 13, 2023 16:21 IST2023-09-13T16:21:25+5:302023-09-13T16:21:41+5:30
पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सहा जणांचा हल्ला

आधी चाकूने वार, मग केबल वायरने १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण; रुग्णालयात उपचार
विलास जळकोटकर, सोलापूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सहाजणांनी मिळून एका १७ वर्षाच्या मुलीला चक्क चाकूने वार करुन केबलच्या वायरनं बेदम मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. संध्याराणी शिवाजी केदार (वय १७) असे या जखमी मुलीचे नाव आहे.
यातील जखमी मुलीशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी भंडीशेगाव येथील कुबेर हरिबा कदम, सुधीर कुबेर कदम यांच्यासह सहाजणांनी मिळून चाकूने वार करुन जखमी केले. केबल वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. यात जखमी संध्याराणी हिच्या कपाळाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात तिला त्रास होऊ लागल्याने जवळच असलेल्या पंढरपुरातील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोलापूरला नेण्याचा सल्ला दिला. तिला मामा तानाजी काळे यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.