15,000 corona positive patients in 16 days in Solapur district; 267 killed | सोलापूर जिल्ह्यात १६ दिवसात १५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; २६७ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात १६ दिवसात १५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; २६७ जणांचा मृत्यू

सोलापूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने आत्तापर्यंतचे विक्रम मोडीत काढले आहेत. १६ दिवसात दीड लाख चाचण्यात १५ हजार १३८ जण पॉझिटिव्ह आढळले तर २६७ जणांचा मृत्यू झाला आहे.


एप्रिल २०२० मध्ये कोरोनाने सोलापूर जिल्ह्यात शिरकाव केला. पहिल्या लाटेत म्हणजे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे १५ हजार ३०९ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णवाढीचा आलेख खाली गेला होता. सन २०२१ मध्ये मात्र एप्रिल महिन्याच्या १६ दिवसात सप्टेंबर महिन्याच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे. १ लाख ४४ हजार २२५ चाचण्यात इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १०.४९ टक्के इतके आहे. सोलापूर शहराच्या दुप्पट ग्रामीण भागात दररोज रुग्ण आढळत आहेत.

पहिल्या लाटेपेक्षा या लाटेचा संसर्ग वेगाने होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील वेळेस एक पॉझिटिव्ह रुग्ण चार ते पाच जणांना बाधित करीत होता. यावेळचे हे प्रमाण १० ते १५ जणांवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंब व गल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णवाढ वेगाने होत आहे. मागील वेळेस लोकांमध्ये भीती असल्याने बाधित व्यक्ती तातडीने उपचारासाठी दाखल होत होत्या. पण आता कोरोनाबाबत भीती कमी झाल्याने उशिराने लोक उपचारास दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. या लाटेत लहान मुले व तरुणांनाही बाधा झाल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शहरात सर्वच भागात कोरोनाचा फैलाव दिसून येत आहे तर ग्रामीण भागात गावे बाधित होताना दिसत आहेत. पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे.
 

Web Title: 15,000 corona positive patients in 16 days in Solapur district; 267 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.