माढा तालुक्यातील १ हजार ८५ घरकुले लाभार्थ्यांकडून अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:04+5:302020-12-11T04:49:04+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील ११७ गावात सन-२०१६ -२०२० या पाच वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारच्या प्रधानमंत्री, रमाई, ...

माढा तालुक्यातील १ हजार ८५ घरकुले लाभार्थ्यांकडून अपूर्ण
कुर्डूवाडी
: माढा तालुक्यातील ११७ गावात सन-२०१६ -२०२० या पाच वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारच्या प्रधानमंत्री, रमाई, शबरी, पारधी अशा विविध आवास योजनेअंतर्गत एकूण ३ हजार ६२८ उद्दिष्टापैंकी ३ हजार २४० घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी आतापर्यंत २ हजार ३९२ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर १ हजार ८५ घरकुले अद्यापही विविध कारणांनी लाभार्थ्यांकडून अपूर्णच राहिली आहेत. यामुळे प्रशासनाला त्याचा फटका बसत आहे.
पंचायत समितीच्या वतीने ज्यांनी घरकुलाची रक्कम उचलली आहे, परंतु अद्यापही आपले घरकुल बांधकाम केले नाही अशा ९९ लाभार्थ्यांना १२ डिसेंबर रोजी माढा न्यायालयाच्या लोक अदालतमध्ये बोलावले आहे.
माढा तालुक्यामध्ये सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७६१ घरकुले मंजूर होती. त्यातील ७०१ घरकूल पूर्ण झाले. ६० अपूर्ण राहिलेत. त्यातील ३० लाभार्थ्यांनी हफ्ते शासनाला परत केले. याच कालावधीत रमाईची २६८ घरकुले मंजूर झाली. त्यातील २५१ पूर्ण झाली. १७ अपूर्ण राहिलेत. त्यातील ५ जणांनी अनुदान माघारी दिले आहे. या काळातील शबरी व पारधी आवास योजनेतील लाभार्थ्यांनी १०० टक्के लाभ घेतला आहे. २०१७-१८ या कालावधीत प्रधानमंत्री योजनेतील ३२८ घरकुले मंजूर झाली. त्यातील २९७ जनांनी बांधकामे पूर्ण केली. ५१ जनांनी अपूर्ण ठेवली. त्यातील चार जणांनी अनुदान परत केले आहे. याच काळात रमाई नेअंतर्गत ६६१ घरकुले मंजूर झाली. त्यातील ५३४ घरे पूर्ण झाली. १५६ लाभार्थ्यांनी घरकुले बांधली नाहीत. पण त्यापैकी केवळ दोन जनांनी अनुदान परत केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर १७६ पैंकी १४८ पूर्ण झाली आहेत, तर ४१ अपूर्ण आहेत. तर या कालावधीतील रमाईच्या ३५९ मंजूर घरकुलापैंकी २०४ पूर्ण झाली. १६९ ही अपूर्ण राहिली आहेत. त्यातील एक जणांनी अनुदान माघारी दिले आहे, तर सन २०१९-२० या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर ६६९ पैंकी २३९ पूर्ण झाली आहेत, तर ५९० अपूर्ण राहिली आहेत
......
माढा तालुक्यात आतापर्यंत ज्यांनी घरकुलाचे हफ्ते घेतले आहेत. सूचना देऊनही काही लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत घरकुले बांधली नाहीत अशा ९९ जणांना न्यायालयात बोलावले आहे, याबाबत माढा न्यायालयानेही लाभार्थ्यांना नोटीस बजावली आहे.
- डॉ. संताजी पाटील
गटविकास अधिकारी, माढा