ट्रेनमध्ये तिकीटाशिवाय प्रवास करणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि प्रत्येक जबाबदार नागरिकाला हे माहित आहे, तरीही काही लोक जाणूनबुजून तिकीट काढत नाहीत. यामुळे अनेकदा प्रवासी आणि टीटीई यांच्यात वाद होतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला एसी कोचमध्ये तिकीट न घेता प्रवास करत होती आणि तिचा टीटीईशी जोरदार वाद झाला, ज्यामुळे लोक हैराण झाले.
तीन मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मंथली सीझन तिकिटाच्या (एमएसटी) वैधतेवरून महिला आणि टीटीईमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. जेव्हा ती महिला म्हणते की "तुम्हाला समजत नाही", तेव्हा टीटीई उपहासाने उत्तर देतो, "हो, मी का समजून घेऊ?." महिलेचा दावा आहे की, तिच्याकडे रेल्वेने दिलेलं तिकीट आहे, ज्यामुळे ती कोणत्याही कोचमध्ये प्रवास करू शकते.
महिलेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, टीटीईने त्याच्या वरिष्ठांना बोलावलं आणि त्यांना स्पीकरवर महिलेशी बोलायला लावलं. फोनवर टीटीईने सांगितलं की एक महिला फर्स्ट एसी पास घेऊन सेकंड एसी कोचमध्ये बसली आहे आणि तिचा पास वैध असल्याचा दावा करत आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितलं की, असा कोणताही नियम नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून २२ हजारांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे आणि त्याला ३५० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्सना पोस्टवर भरपूर कमेंट केल्या आहेत. "मॅडमने नियमांवर टीटीईशी जास्त वाद घालू नये" असं एकने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "असं बोलू नकोस, नाहीतर तुझ्यावर कारवाई होऊ शकते" असा सल्ला दिला आहे.