महाकुंभमेळ्याला आजापासून सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात दीड कोटी भाविक, साधुंनी स्नान केले. अशातच महाकुंभ मेळ्यात आज एका सुंदर साध्वीला पाहिले गेले आणि सर्व कॅमेरांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या. एवढेच नाही तर ती तरुणी देखील आपण साध्वी असल्याचे सांगत सुटली होती. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होत होते. तितक्यात अनेकांना हा चेहरा ओळखीचा वाटला आणि तिचे बिंग फुटले.
सुंदर साध्वीचा इंटर्व्ह्यू घेण्यास प्रसारमाध्यमांनी सुरुवात केली. ती देखील त्यात आपण साध्वी असल्याचे सांगत सुटली होती. काही युजरनी ती साध्वी नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा रिछारिया असल्याचे म्हटले आहे. ती बऱ्याच काळापासून इन्स्टाग्रामवर कंटेंट बनवत असते. हर्षा ही आध्यात्मिक, धार्मिक विषयांवर व्हिडीओ पोस्ट करत असते. याचबरोबर ती मेकअप कसा करायचा याचेही व्हिडीओ पोस्ट करत असते. याशिवाय ती काही शो देखील होस्ट करते.
एक्सवर हर्षाची पोलखोल करण्यात आली आहे. एका युजरने हर्षा ही दोन महिन्यांपूर्वी इव्हेंट होस्ट करत होती, मग ती अचानक साध्वी कशी काय झाली, असा सवाल केला आहे. अन्य एका युजरने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट टॅग करत ही सनातन धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे.
हर्षाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंदगिरी जी महाराज यांची शिष्या असल्याचे म्हटले आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर, ती बहुतेक धार्मिक विषयांवर सामग्री तयार करताना दिसते.