कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:49 IST2026-04-06T13:47:59+5:302026-04-06T13:49:08+5:30
सोशल मीडियावर सध्या प्रिया पटेल हे नाव वेगाने ट्रेंड होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या कंटेंट क्रिएटरच्या एका वक्तव्याने इमिग्रेशनवर असा वाद सुरू केला आहे, जो आता ओळख, संस्कृती आणि 'आपुलकी' यांसारख्या मोठ्या प्रश्नांपर्यंत पोहोचला आहे

कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
अमेरिका सध्या इराणविरुद्ध युद्धात अडकला आहे. त्यात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत ट्रम्प यांना घेरले जात आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांच्या मेगा(MAGA) समर्थकांनीही सध्या ट्रम्प यांच्यापासून अंतर ठेवल्याचे दिसून येते. यातच अमेरिकेत स्थलांतरित विरुद्ध 'मूळ अमेरिकन' हा वाद पुन्हा एकदा पेटलेला दिसतोय आणि भारतीय वंशाची कंटेंट क्रिएटर प्रिया पटेल या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे.
सोशल मीडियावर सध्या प्रिया पटेल हे नाव वेगाने ट्रेंड होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या कंटेंट क्रिएटरच्या एका वक्तव्याने इमिग्रेशनवर असा वाद सुरू केला आहे, जो आता ओळख, संस्कृती आणि 'आपुलकी' यांसारख्या मोठ्या प्रश्नांपर्यंत पोहोचला आहे. प्रिया पटेल तिच्या रोखठोक विचारांसाठी आणि 'MAGA' समर्थक कंटेंटसाठी ओळखली जाते. अनेकदा तिने एक्सवर संस्कृती, ओळख आणि राजकारण यावर तिची स्पष्ट मते मांडली आहेत. परंतु अलीकडेच तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओत तिने जर इमिग्रेशनसोबत असिमिलेशन होत नसेल तर ते इनवेजन म्हणजेच घुसखोरीसारखे असते असं म्हटलं आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर जर एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन तिथली भाषा, कायदा सुव्यवस्था, तिथले राहणीमान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत नसेल तर तो मिळून मिसळून राहण्याऐवजी वेगळा पडतो. अशी परिस्थिती अस्वस्थ करणारी वाटू शकते. प्रियाचे हेच विधान सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहे. मोठ्या संख्येने लोक तिच्यावर टीका करत आहेत. एका अशा कुटुंबातील व्यक्ती, जे स्वत: इमिग्रेशनमधून आली ती असं विधान कसं करू शकते असा प्रश्न युजर्सने विचारला आहे. काहींनी हा विरोधाभास असल्याचे सांगत स्वत:च्या ओळखीपासून अंतर ठेवत असल्याचं म्हटलं आहे.
Two white men defending the immigrants & a brown Indian origin girl talking about deporting them. What a irony
— Veena Jain (@Vtxt21) April 4, 2026
Priya Patel is suffering from inferiority complex
pic.twitter.com/oaF9CtTxMc
हा वाद इथेच संपला नाही तर टीकाकारांनी ट्रोल केल्यानंतर प्रिया पटेल हिने आणखी एक व्हिडिओ जारी केला. ज्यात तिने सगळ्या संस्कृती एकसारख्या नसतात. अमेरिकेला हे ठरवायचा अधिकार आहे, की कोणत्या लोकांना ते देशात येऊ देताहेत असा तर्कही तिने दिला. पियर्स मॉर्गन यांच्या पियर्स मॉर्गन अनसेंसर्ड शोमध्येही तिने मुलाखत दिली. ज्यात मॉर्गन यांनी प्रिया पटेल यांच्या विचारांवर कठोर प्रश्न करत तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख केला. या मुलाखतीत प्रिया पटेल हिने माझे वडील मूळ भारतीय आहेत परंतु त्याआधी माझे कुटुंब युगांडा आणि यूकेहून अमेरिकेत पोहचले असं सांगितले.
दरम्यान, प्रिया पटेल हिच्या मुलाखतीचा हा भाग सोशल मीडियावर विशेषतः भारतीय समाजात झपाट्याने व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी याला आपल्या मुळांपासून दूर जाण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले तर इतरांनी याला अस्मिता आणि वैयक्तिक मतांमधील संघर्ष म्हणून पाहिले. एकूणच हा मुद्दा आता केवळ एका विधानापुरता मर्यादित न राहता अस्मिता, ओळख आणि सामाजिक स्वीकृती यांबद्दलची एक व्यापक चर्चा बनला आहे.