आजच्या सोशल मीडियाच्या युगात ‘व्हायरल व्हिडीओ’ ही कमी वेळात प्रसिद्ध होण्याची ट्रिक बनला आहे. काही सेकंदांचं फुटेज लाखो लोकांपर्यंत पोहोचतं आणि अगदी सामान्य व्यक्तीही क्षणात चर्चेत येतो. पण कधी कधी ही प्रसिद्धीची हाव लोकांना इतकी आंधळी करते की ते कुठे आहेत, काय करत आहेत, याचं भानच राहत नाही. असंच काहीसं एका नवरा-बायकोने केलं आणि आता त्यांचा ‘हायवे स्टंट’ थेट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, लोक आता त्यांची खिल्ली उडवत आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?या व्हायरल क्लिपमध्ये एक महिला लाल रंगाच्या साडीत हायवेच्या मधोमध उभी राहून एखाद्या बॉलिवूड गाण्यावर जोरदार नाच करताना दिसत आहे. तर, तिचा नवरा बाजूला उभा राहून, हेल्मेट घालून, अत्यंत तन्मयतेने तिचा व्हिडीओ शूट करत आहे. त्यांच्या व्हिडीओवर तसा कुणाला आक्षेप नाही, पण त्यांनी निवडलेली जागा मात्र अत्यंत धोकादायक आणि चुकीची आहे.
हा प्रकार चालू असताना दुसऱ्या दिशेने जाणारे वाहनचालक आश्चर्याने थांबतात, तर काही जण त्यांच्याकडे पहात राहतात. अशाच एका व्यक्तीने या नवरा-बायकोच्या ‘रील शो’चा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस'ChapraZila' या नावाच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे आणि काही तासांतच तो व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७८,००० पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून, शेकडो लोकांनी विनोदी कमेंट्ससह आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नेटकरी?एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, “हे खरं प्रेम असतं, जेव्हा नवरा रीलसाठी त्याचा जीव धोक्यात घालतो!” दुसरा म्हणतो की, “साडीत रील चालेल, पण हायवेवर? थोडा विचार तरी करा!” तर, आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, “जर तुम्हाला आयुष्य सुखात हवं असेल, तर पत्नीचं ऐका. मग, ती हायवेवर नाचायला सांगो किंवा टेरेसवर!”
या नवरा-बायकोने केलेलं हे शूट भले एखाद्या फिल्मी दृश्यासारखं वाटत असलं, तरी त्यात जीवाचा खेळ सुरू आहे, हे विसरूनही चालणार नाही, असं देखील लोकांनी म्हटलं आहे.