Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:22 IST2025-10-06T15:20:56+5:302025-10-06T15:22:40+5:30
King Mswati III Viral Video: संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी विमानतळावरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी विमानतळावरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इस्वातिनीचे राजा मस्वाती तिसरा त्यांच्या मोठ्या ताफ्यासह एका खासगी जेटमधून उतरताना दिसत आहेत. राजाचा रुबाब आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींची प्रचंड संख्या पाहून लोक थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे, विमानतळावरील काही कर्मचारी त्यांना वाकून नमस्कार करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये राजा मस्वाती तिसरा हे आपल्या पत्नी, मुले आणि अंदाजे १०० नोकरांच्या प्रचंड लवाजम्यासह अबू धाबीत दाखल झाले. या शाही ताफ्यामुळे विमानतळावरील सर्व सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शाही कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे सामान व्यवस्थापित करताना मोठी अडचण निर्माण झाली. या प्रचंड गर्दीमुळे अखेर प्रशासनाला विमानतळाचे तीन टर्मिनल बंद करावे लागले आणि तात्पुरते लॉकडाऊन करावे लागले.
आलिशान जीवनशैलीने जगभर चर्चा
राजा मस्वाती तिसरा हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी जगभर ओळखले जातात. व्हायरल झालेल्या 'fun_factorss' नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरील व्हिडिओमध्ये राजा त्यांच्या पारंपारिक पोशाखात दिसत आहेत, तर त्यांच्या पत्नी चमकदार, रंगीबेरंगी आफ्रिकन पोशाखात आहेत. त्यांचा १०० सदस्यांचा दल शाही सामान आणि रसद व्यवस्थापित करण्यात व्यस्त होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. अनेकांनी राजाच्या कुटुंबाची तुलना एका संपूर्ण गावाशी केली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक
इस्वातिनीवर १९८६ पासून राज्य करणारे राजा मस्वाती तिसरा हे जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक मानले जातात. त्यांची अंदाजे एकूण संपत्ती १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. एका अहवालानुसार, राजा मस्वाती तिसरा यांच्या १५ पत्नी आणि ३५ पेक्षा जास्त मुले आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे वडील, स्वाझीलंडचे माजी राजा यांच्या ७० पेक्षा जास्त बायका आणि २१० पेक्षा जास्त मुले होती, असे म्हटले जाते.