Viral News ( Marathi News ) : सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होण्यासाठी रीलस्टार काहीही करतात. अनेकजण कोणताही धोका पत्करुन रील तयार करतात. सध्या असाच एक रील व्हायरल झाला आहे. या रीलमध्ये एक तरुण चक्क रेल्वेरुळावर झोपल्याचे दिसत आहे, त्याच्यावरुन एक वंदे भारत ट्रेन स्पीडने गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेश येथील उन्नावचा आहे.
हसनगंजच्या न्योतानी शहरातील मोहल्ला दयानंद नगर २२ वर्षीय रणजीत चौरसिया असं या रीलस्टारचं नाव आहे. इंस्टाग्रामवर व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने हा धोकादायक व्हिडीओ बनवला. पहिल्यांदा तो कानपूर-लखनौ रेल्वे मार्गावरील कुसुंबा स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅकवर झोपला आणि नंतर वरून जाताना वंदे भारतचा व्हिडीओ बनवला आणि तो पोस्ट केला. त्याने बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली.
VIDEO: मेट्रोत मद्यपान? भरलेला ग्लास तरुणाने केला रिकामा, अंडही खाल्लं
पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर तरुणाच्या वडिलांनी वेगळाच दावा केला आहे. हा व्हिडीओ एडिट केला असल्याचा दावा त्यांनी केला. अधिकारी अरविंद पांडे यांनी सांगितले की, रणजीत सोहरामऊ येथील एका ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या गोदामात काम करतो. याशिवाय तो एक युट्यूबर देखील आहे. ३ एप्रिल रोजी तो अजगैनमधील कुसुंभी येथे जत्रा पाहण्यासाठी गेला होता.
यावेळीच त्याने कानपूर-लखनौ रेल्वे मार्गावर ट्रॅकवर झोपला. यावेळी त्याच्यावरुन वंदे भारत रेल्वे गेली. याचा त्याने व्हिडीओ बनवला आहे. त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. सोमवारी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओची दखल घेत, तपास करण्यात आला आणि रविवारी रात्री रणजीतला त्याच्या घरातून अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने व्हिडीओ बनवल्याची कबुली दिली. तसेच रणजीतने व्हिडीओ एडिट करून पोस्ट करणार असल्याची चर्चा आहे.
जीआरपी एसओ अरविंद पांडे यांनी सांगितले की, त्याचा मोबाईल तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जात आहे. जर व्हिडीओ एडिट केला असेल तर तपासादरम्यान सत्य बाहेर येईल. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
वडिलांनी व्हिडीओ एडिट केल्याचा दावा केला
रणजीत याच्या वडिलांनी हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन वर्षापासून मुलगा इन्स्टाग्रामवर व्हिडीओ तयार करत आहे. तो एडिट करुन व्हिडीओ अपलोड करतो. रेल्वेचा व्हिडीओही तसाच त्याने एडिट करुन अपलोड केला आहे, असा दावा त्याच्या वडिलांनी केला. त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर १००८ व्हिडीओ आहेत. त्याचे ५० हजार फॉलोअर्स आहेत.