ऑस्ट्रेलियामधील एक जोडपे सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. मात्र, त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण देखील भन्नाट आहे. वयाच्या ९३व्या वर्षी एक व्यक्ती पती बनला आहे. या व्यक्तीचे नाव जॉन लेवीन असून, हा व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची पत्नी अवघ्या ३७ वर्षांची आहे. या व्यक्तीची पत्नी देखील डॉक्टर असून तिचे नाव यांगयिंग लू आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला. आता हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या बाळाचेही प्लॅनिंग करत आहेत.
डॉ. लेविन यांनी सांगितले की, "आम्ही पुन्हा एकदा पालक बनण्याचा प्रयत्न करत आहोत. हा प्रवास खूप आव्हानात्मक पण समाधान देणारा होता. आम्ही पूर्ण संयम ठेवला आणि आता पुन्हा एकदा या अनुभवासाठी तयार आहोत." सध्या ते त्यांचा मुलगा जॉन गॅबी सोबत आनंदात जीवन जगत आहेत.
११६व्या वर्षी मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट!
डॉ. लेविन यांनी दीर्घ आणि सक्रिय आयुष्याचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, "गेल्या तीन दशकांपासून मी नियमितपणे 'ह्यूमन ग्रोथ हार्मोन'चे इंजेक्शन घेत आहे. दररोज व्यायाम करतो आणि दारू तसेच तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळतो. लांब आणि सक्रिय जीवनाचे रहस्य शिस्त आणि संतुलन आहे."
विशेष म्हणजे, डॉ. लेविन यांचे एक मोठे उद्दिष्ट आहे. ते म्हणाले, "माझे लक्ष्य आहे की मी माझ्या मुलाच्या २१ व्या वाढदिवसाला उपस्थित असावे." मुलाच्या २१व्या वाढदिवसापर्यंत डॉ. लेविन यांचे वय ११६वर्षे होईल. त्यांचा हा आत्मविश्वास आणि निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करत आहे.
लोक आम्हाला मुलाचे आजोबा समजतात!
डॉ. लेविन यांच्या पत्नी डॉ. लू यांनी लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, "लोकांची प्रतिक्रिया अनेकदा आश्चर्यकारक असते. बऱ्याचदा लोकांना वाटते की जॉन हा डॉ. लेविन यांचा नातू किंवा पणतू आहे. जेव्हा आम्ही सांगतो की ते त्याचे वडील आहेत, तेव्हा लोक थक्क होतात. पण, आमच्यासाठी हा आनंदाचा विषय आहे. हा निर्णय आमच्या कुटुंबासाठी योग्य वाटला म्हणून आम्ही घेतला."