सध्या सोशल मीडियात चीनच्या एका फॅक्टरीतील हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक इंडस्ट्रीयल रोबोट अचानक अनियंत्रित होऊन हिंसक झाल्याचं दिसून येते. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे म्हणजे कोडिंग चुकल्याने झाला. या दुर्घटनेत २ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की, फॅक्टरीत काम करताना रोबोट अचानक कंट्रोल बाहेर जातो, त्यानंतर तिथं उपस्थित २ कर्मचाऱ्यांवर हल्ला करायला लागतो. जसा हा प्रकार घडतो तसं कंपनीत गोंधळ उडतो. कर्मचारी त्यांचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळतात. माहितीनुसार, यूनिट्री रोबोटिक्सनं बनवलेल्या H1 नावाच्या रोबोटमुळे ही दुर्घटना घडली. या रोबोटची किंमत ६.५ लाख रुपये आहे. तो एक ह्यूमनॉइड रोबोट आहे. जो माणसासारखा वागतो. मात्र या रोबोटच्या प्रोग्रामिंगमध्ये आलेल्या छोट्या चुकीमुळे मोठी घटना घडली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना फॅक्टरीतील इतर कर्मचाऱ्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर सुरक्षा मानक आणि रोबोटच्या प्रोग्रामिंगची तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे अशी दुर्घटना पहिल्यांदाच घडली नाही. याआधीही रोबोट नियंत्रणाबाहेर गेल्याच्या बातम्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एका टेक फेस्टिवलमध्ये रोबोट अचानक लोकांच्या दिशेने धावला, त्यामुळे लोक घाबरले होते. यासारख्या घटनांमुळे आपण तंत्रज्ञानावर इतका भरवसा ठेवू शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत. काही युजर्सने मशीनवर पूर्णपणे निर्भर राहणे मानवी जीवनासाठी किती धोकादायक असू शकते यावर चिंता व्यक्त केली. तर काहींनी जोपर्यंत रोबोटच्या प्रोग्रामिंगमध्ये मानवी चूक शक्य आहे तोपर्यंत तंत्रज्ञान पूर्णत: सुरक्षित समजणे धोकादायक ठरू शकते असं म्हटलं आहे. या दुर्घटनेनंतर फॅक्टरीत कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवली असून रोबोटिक यूनिट्सची पुन्हा चौकशी सुरू केली आहे.