Viral Video : सोशल मीडियावर रोजच काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, यातही काही व्हिडीओ असे असतात, जे प्रत्येकाच्या काळजाला हात घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फूटपाथवर स्वयंपाक करत असलेले एक कुटुंब पाहायला मिळाले आहे. इतक्या कठीण परिस्थितीतही या कुटुंबाची एकमेकांना मिळालेली साथ सगळ्यांचे मन जिंकून घेत आहे. या व्हिडीओमुळे अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
या व्हिडीओमध्ये एक गरीब फुटपाथवर राहणारे कुटुंब भर पावसात आपल्या उदरभरणाची सोय करताना दिसत आहे. एकीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. काही लोक या पावसाचा मनमुराद आनंद घेत असताना काही लोकांना मात्र, या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हा मोठा प्रश्न पडला आहे.
बाबांची तळमळ
कोसळत्या पावसात आपल्या चिमुकल्यांचे पोट भरावे म्हणून एका बापाची धडपड सुरू आहे. कितीही पाऊस पडत असला, तरी या बाबाने चूल पेटवून अन्न शिजवायला सुरुवात केली आहे. बाबाने चूल तर पेटवली आहे, पण वरून कोसळणाऱ्या मुसळधारा ही चूल विजवतील आणि आपल्या बाबांची मेहनत वाया जाईल, अन्न खराब होईल हा विचार चिमुकल्यांच्या मनात आला. त्यांनी लगेच रस्त्यावर पडलेला प्लायचा तुकडा उचलून आणला आई तो आपल्या बाबांच्या आणि चुलीच्या वर धरला आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट चुलीत पडत नाही.
चिमुकल्यांची कसरत
पावसाचा प्रत्येक थेंब चिमुकल्यांनी धरून ठेवलेल्या त्या फळीवर पडतो. परंतु, दोन्ही मुले त्यांचे हात अजिबात हलवत नाहीत, जणू काही ही त्यांची रोजची दिनचर्या आहे. व्हिडीओमध्ये त्यांचे कपडे ओले झालेले दिसत आहेत, त्यांच्या पायाजवळ पाणी साचले आहे. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात त्रस्त भाव किंवा तक्रार नाही. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले की, ही मुले आयुष्याच्या शाळेत शिकत आहेत, जिथे मेहनत नावाची जबाबदारी आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आयुष्य प्रत्येकासाठी सारखं नसतं आणि सगळ्यांना सगळंच मिळतं असं नाही, असे म्हटले आहे.