लग्न करणं, संसार थाटणे, एखाद्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे किंवा लग्न न करणे हे प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा प्रश्न असतो. परंतु तुमच्या या गोष्टीचा परिणाम करिअरवर झाला तर..तुम्ही याचा विचार केला नसेल परंतु प्रत्यक्षात असे घडलं आहे. चीनमध्ये एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना अजब फर्मान काढलं जे सोशल मीडियात चर्चेत आले आहे. कारण या कंपनीने जो आदेश दिलाय तो केवळ एका कंपनीशी संबंधित असला तरी हा मुद्दा जगातील प्रत्येकाशी निगडीत आहे ज्यांचं अद्याप लग्न झालं नाही.
कंपनीने दिला अल्टिमेटम
चीनच्या शेडोंग प्रांतात असलेल्या शेंडोंग शंटियन केमिकल ग्रुप कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अजब फर्मान काढत अल्टिमेटम दिला आहे. कंपनीत जे कुणी सिंगल आणि घटस्फोटीत कर्मचारी आहेत त्यांनी सप्टेंबर २०२५ पर्यंत लग्न करावं, जे कर्मचारी या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांना कामावरून काढण्याची धमकी कंपनीने दिली आहे.
लग्न नाही तर नोकरी नाही...
साऊथ चायना पोस्टनुसार, कंपनीने नोटिशीत म्हटलंय की, २८ वर्षापासून ते ५८ वर्षापर्यंतच्या सर्व अविवाहित कर्मचाऱ्यांना सूचित केले जातंय, यात घटस्फोटीत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर २०२५ पर्यंत लग्न करून संसार थाटावा. जर कर्मचाऱ्यांनी या सूचनेचे पालन केले नाही तर त्यांना नोकरीवरून काढण्यात येईल असा इशारा कंपनीने दिला आहे.
कंपनीनं अजब फर्मान का काढलं?
कंपनीच्या या आदेशावर चहुबाजूने टीका झाल्यानंतर त्यांनी आदेश मागे घेतले. कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्या वैवाहिक स्थितीवरून कामावरून काढलं जाणार नाही असं कंपनीला सांगावे लागले. चीन सरकारकडून आणलेल्या धोरणाचा आढावा देत कंपनीने त्यांच्या आदेशाचं समर्थनही केले. विवाह दरात सुधारणा आणण्यासाठी चीन सरकारकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. आपल्या आई वडिलांचं न ऐकणे हा मुलाचा धर्म नाही. सिंगल राहणे अजिबात चांगले नाही असं कंपनीने म्हटलं आहे.
दरम्यान, कंपनीने काढलेला हा आदेश चुकीचा आहे. कंपनीचा हा आदेश चीनच्या कामगार कायदा आणि कराराचं उल्लंघन केल्याचा प्रकार आहे असं चीनच्या सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. कंपनीचा अजब आदेश सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर कंपनीने त्यांनी काढलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला.