व्वा डॉक्टर! चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 12:13 IST2021-05-23T11:16:53+5:302021-05-23T12:13:50+5:30
डॉक्टरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; सर्वांकडून डॉक्टरांचं कौतुक

व्वा डॉक्टर! चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
धुळे: गेल्या वर्ष दीड वर्षापासून डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कालावधीत शेकडो डॉक्टरांनी रुग्णसेवा करताना प्राण गमावला. मात्र तरीही ते त्यांच्या कर्तव्यापासून जराही विचलित झालेले नाहीत. रुग्णसेवेत स्वत:ला झोकून देणाऱ्या, तासनतास कर्तव्य बजावणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या कहाण्या आपण गेल्या काही महिन्यांपासून ऐकत आहोत. यानंतर आता धुळ्यातील एका डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वेळेआधी जन्मलेल्या मुलांना निओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (NICU) ठेवण्यात येतं. या मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. धुळ्यातील एनआयसीयूमध्ये दाखल असलेलं असंच एक बाळ रात्री अचानक मोठमोठ्यानं रडू लागलं. या बाळाला शांत करण्यासाठी, त्याला झोप यावी म्हणून तिथे असलेल्या डॉ. अभिनय दरवडे यांनी त्याच्यासाठी एक सुंदर गाणं गायलं. 'इस मोड से जाते है.. कुछ सुस्त क़दम रस्ते.. कुछ तेज़ क़दम राहें..' या गाण्याच्या ओळी डॉक्टरांनी बाळाला गाऊन दाखवल्या. विशेष म्हणजे त्यावेळी बाळाचं रडणं पूर्णपणे थांबलं होतं. डॉक्टरसाहेब तानसेन झाले असताना इवलंसं बाळ कानसेन झालं होतं आणि डॉक्टरांचं गाणं अगदी तल्लीन होऊन ऐकत होतं.
NICU मधील बाळासाठी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ डॉ. अभिनय दरवडे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. त्या दिवशीचा अनुभव डॉक्टरांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. 'आमच्या NICU मधल्या ९०० ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती! कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दूध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला! मग काय रात्री रडायला सुरुवात! NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली! रडणं काही थांबेना! मग त्याला जरा बाहेर आणलं (केबिन मध्ये)आणि गाणं म्हटलं, तसं ते शांत होऊन गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं! इवलंसं आहे पण स्वतःला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने!', अशी पोस्ट लिहून डॉक्टरांनी त्यांच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत.
डॉक्टरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. जवळपास दीड हजार जणांनी व्हिडीओ लाईक केला असून त्यावर साडे तीनशे जणांच्या कमेंट्स आल्या आहेत. १५ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून जवळपास ४०० जणांनी तो शेअर केला आहे.